बनावट धर्मपरिवर्तन दाखवून खातून बी सैय्यद गफ्फार या महिलेने अनुसूचित जागेवर सरपंचपद प्राप्त केल्याचा आरोप
या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्यास बनावट कागदपत्र सादर करणारी महिला आणि बनावट कागदपत्रांची पूर्तता करणारे यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !
बुलढाणा – सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत धाड सरपंचपदासाठी बनावट धर्मपरिवर्तन दाखवून खातून बी सैय्यद गफ्फार या महिलेने अनुसूचित जागेवर सरपंचपद प्राप्त केले. जातीचे बनावट प्रमाणपत्र सिद्ध करणे आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करणे या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य अन् प्रमोद भरत वाघुर्डे यांनी जालना, तसेच बुलढाणा येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करून सरपंचपद रिक्त करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जात प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या कागदपत्रात दाखवले आहे की, बाबुराव लहाने यांची मुलगी भारती हिने धाड येथील सैय्यद गफ्फार यांच्यासमवेत विवाह केला. भारती लहाने यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शाळेची कागदपत्रे जोडली. त्यात त्यांची जात अनुसूचित नोंदवली आहे.
शाळेची स्थापना १९८५ ची, तर शाळा सोडल्याचा दाखला १९८३ चा
गफ्फार यांनी शाळेतील प्रवेश २३ जुलै १९८३ या दिवशीचा दाखवला आहे. मुळात शाळेची स्थापना वर्ष १९८५ मध्ये झाली आहे. बाबुराव लहाने यांना मिळालेला शिधापत्रिका क्रमांक एस्.पी. ४९६८१५ यावर भारती लहाने यांच्यासमवेत अन्य ५ नावे आलेली आहेत. मुळात या क्रमांकाची मूळ शिधापत्रिका नसीम बी परवेज बाबला (रा. जालना) यांची आहे. महिलेने स्वतःचा जन्मदिनांक १ जानेवारी १९७७ असा सांगितला आहे आणि स्वतःचा निकाह हा सैय्यद गफ्फार यांच्यासमवेत १ एप्रिल १९६६ मध्ये झाल्याचा पुरावा दिला आहे. म्हणजे तिचा जन्म निकाह होण्याच्या १० वर्ष ९ मास आधीचा आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.