माघ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. ७.३.२०२१ ते १३.३.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, माघ मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. श्री रामदासनवमी : माघ कृष्ण पक्ष नवमी या दिवशी श्री रामदासनवमी साजरी करतात. हा समर्थ रामदासस्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. सूर्योदयव्यापिनी माघ कृष्ण पक्ष नवमी तिथीला श्री रामदासनवमी साजरी करतात.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ७.३.२०२१ या दिवशी रात्री ८.५९ पासून ८.३.२०२१ दुपारी ३.४५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. ७.३.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.१४ पासून ८.३.२०२१ या दिवशी दुपारी ३.४५ पर्यंत आणि ११.३.२०२१ या दिवशी दुपारी २.४० पासून उत्तररात्री २.४९ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. ८.३.२०२१ या दिवशी सोमवार असून दुपारी ३.४५ नंतर एकादशी तिथी असल्याने दुपारी ३.४५ पासून मंगळवारी सूर्योदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.
२ उ. विजया एकादशी : माघ कृष्ण पक्ष एकादशीला ‘विजया एकादशी’ म्हणतात. या दिवशी श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णु यांची पूजा करतात. या दिवशी एकादशी महात्म्य, श्री विष्णुसहस्र नामावली वाचावी. पद्मपुराणानुसार ‘विजया एकादशीच्या व्रताने मनोवांच्छित फळ प्राप्त होते. सर्व पापांचा नाश होतो आणि पितृदोष दूर होतो’, असे मानले जाते.
२ ऊ. बुधप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. बुधवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘बुधप्रदोष’ किंवा ‘सौम्यवार प्रदोष’ म्हणतात. शिक्षण, ज्ञानप्राप्ती आणि मनोकामना पूर्तीसाठी ‘सौम्यवार प्रदोष’ हे व्रत करतात.
२ ए. महाशिवरात्र : प्रत्येक मासात कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्र व्रत करतात; परंतु माघ मासातील शिवरात्रीला ‘महाशिवरात्र’ असे म्हटले जाते. प्रत्येक मासातील शिवरात्र व्रत ज्यांना करता येत नाही, त्या व्यक्तीही महाशिवरात्रीचे व्रत करतात. या व्रतासाठी त्रयोदशीला रात्रीपासून ते चतुर्दशीचा पूर्ण दिवस उपवास करतात. चतुर्दशीच्या दिवशी पहाटे नदीमध्ये स्नान करून (शक्य नसेल, तर स्नानाच्या वेळी नद्यांचे नाव घ्यावे.) शिवलिंगावर रुद्राभिषेक करून भक्तीभावाने पूजा करतात. पूजेच्या वेळी एक लक्ष, एक सहस्र किंवा एकशे आठ बिल्वपत्रे वहातात. दिवसभर उपवास करून रात्री जागून शिवभजनात किंवा नामस्मरणात घालवतात. संपूर्ण भारतभर महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरात मोठा उत्सव साजरा करतात. निशीथकाळी (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीच्या दिवशी शिवरात्र व्रत करावयाचे असते. या वर्षी ११.३.२०२१ या दिवशी शिवपूजन मुहूर्त मध्यरात्री १२.२४ पासून १.१३ पर्यंत आहे.
२ ऐ. दर्श अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. शुक्रवार, १२.३.२०२१ या दिवशी दुपारी ३.०३ पासून १३.३.२०२१ या दिवशी दुपारी ३.५१ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
२ ओ. युगादि : माघ अमावास्या तिथीला ‘युगादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. १३.३.२०२१ या दिवशी दुपारी ३.५१ पर्यंत माघ अमावास्या तिथी आहे.
टीप १ – घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), दग्ध योग, एकादशी, प्रदोष, शिवरात्र आणि कल्पादि यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.२.२०२१)