महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?
आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. सध्या भारतातच नव्हे, तर युरोपमध्येही तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. तापमान वाढीमुळे अंटार्टिक प्रदेशातील बर्फ वितळण्याचा भाग अनेक वर्षांपासून चालूच आहे; मात्र प्रत्यक्ष उष्णतेमुळे अनेक आजार होत असतात. भारतात उष्माघातामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत असतो. उष्णतेची लाट आणि उष्माघात म्हणजे काय उष्णतेच्या लाटेचे परिणाम, त्यामुळे होणारे आजार, नवीन घर बांधतांना उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी काय करावे ? भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भाग ६.
भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/454953.html
५. उष्णतेची लाट
५ अ. उष्णतेची लाट म्हणजे काय ? : भारतीय हवामान विभागानुसार मैदानी प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा अधिक, समुद्रकिनार्यावरच्या ठिकाणी ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा अधिक आणि डोंगराळ प्रदेशातल्या ठिकाणी ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा अधिक होते आणि तापमानात सरासरी तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसने वाढ होते, तेव्हा उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. उष्णतेच्या लाटेमुळे मानवी शरीराचे स्वतःचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता मंदावते आणि म्हणूनच हे धोकादायक ठरते.
५ अ १. उष्णतेच्या लाटेचे परिणाम : वर्ष २००३ मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमध्ये त्यापूर्वीच्या लाटेपेक्षा ७० सहस्र लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अचानक येणारे पूर (फ्लॅश फ्लड्स), जंगलात वणवे लागणे, विमानांच्या उड्डाणांवर परिणाम, रेल्वे रूळ वितळणे अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत.
५ अ १ अ. उष्णतेच्या लाटेमुळे उष्मघाताची शक्यता असते. उष्माघात म्हणजे प्रखर उन्हात अधिककाळ फिरल्यामुळे किंवा तापमानात अधिक पालट असलेल्या जागी वावरल्यामुळे (उदा. वातानुकुलित खोलीतून प्रखर उन्हात वा त्या विरुद्ध) होणारी व्याधी. यात अचानक शरिराचे तापमान १०४ फॅरनहाइट पेक्षा अधिक वाढते. त्यावर नियंत्रण न आल्यास मृत्यू येतो. यास इंग्रजीत ‘सनस्ट्रोक’ किंवा ‘हिटस्ट्रोक’ असे म्हणतात.
५ अ २. येणार्या आपत्काळात उष्णतेची लाट ही आपत्ती मोठी का ठरू शकते ? : हवामान पालटाचा परिणाम जगात दिसून येत आहे. पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहेत. युरोपमधील तापमान ३० डिग्री सेल्सियसपर्यंतही पोचले होते. पुढील काळात यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. ‘एन्व्हॉरन्मेंटल रिसर्च लेटर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार वर्ष २१०० पर्यंत प्रत्येक वर्षी १२० कोटी लोक उष्माघाताला बळी पडू शकतील.
५ अ ३. उष्णतेमुळे होणारे आजार : ‘उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा अतिउष्ण वातावरणात किंवा उष्णतेच्या लाटेमध्ये व्यक्तीला उष्णतेविषयी शारीरिक आणीबाणीला सामोरे जाऊ लागू शकते. याचे ३ टप्पे पुढील प्रमाणे आहेत.
अ. उष्णता पेटके (Heat Cramps)
आ. उष्णता थकवा (Heat Exhaustion)
इ. उष्माघात (Heat Stroke)
उष्णता पेटके होऊ लागल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास एखाद्याला वरील क्रमाने पुढील गंभीर संकटांना सामोरे जावे लागू शकते. काही वेळा पहिला अथवा दुसरा टप्पा अनुभवाला न येता, थेट उष्णता थकवा किंवा उष्माघात होणे असेही घडू शकते. हे तीनही टप्पे गांभीर्याने घ्यायला हवेत. त्याला वैद्यकीय साहाय्य मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत शक्य ते प्राथमिक उपचार करायला हवेत.
अ. उष्णता पेटके (Heat Cramps) : हाताच्या, पिंडर्यांच्या, पायाच्या तळव्यांच्या, पोटाच्या स्नायूंमध्ये पेटके येणे, खूप घाम येणे, अशी लक्षणे यांत आढळतात. बर्याचदा श्रम करतांना अथवा केल्यानंतर काही घंट्यांनंतर हे होऊ शकते.
वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत अशा रुग्णाला…
१. थंड वातावरणात हालवावे. त्याच्यावर थेट सूर्यप्रकाश येणार नाही, असे करावे.
२. पेटके येत असलेले स्नायू हलकेपणाने रगडावेत. पेटके येत असलेले स्नायू हळूवारपणे ताणावेत.
३. थंड पाणी अथवा योग्य क्षारयुक्त पाणी (इलेक्ट्रॉल) प्रत्येक १५ मिनिटांनी द्यावे.
आ. उष्णता थकवा (Heat Exhaustion) : यात शरिराच्या गाभ्याचे तापमान (Core temperature) १०१ ते १०४ डिग्री फॅरनहाईट इतके वाढलेले असू शकते. खूप घाम येतो. त्वचा ओलसर होऊन थंड आणि फिकी पडतेे. त्वचेचा रंग काळपट असेल, तर नखे, ओठ आणि खालची पापणी ओढून पाहिल्यास तेथील त्वचेचा नेहमीचा रंग पालटलेला दिसतो. डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या होणे, भूक नसणे, खूप तहान लागणे, अशक्तपणा, निरुत्साह, स्नायूंच्या वेदना होणे किंवा स्नायूंमध्ये पेटके येणे, चिडचिड होणे, चिंताग्रस्त बनणे, भोवळ येणे आदी लक्षणे यांत आढळतात.
वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत अशा रुग्णाला…
१. थंड वातावरणात हालवावे. त्याच्यावर थेट सूर्यप्रकाश येणार नाही, असे करावे.
२. त्याचे कपडे सैल करावेत.
३. थंड आणि ओले टॉवेल किंवा तत्सम वस्त्रे तोंडवळा, मान, छाती, पाय आदींवर घालावीत.
४. अंगावरून वारे जाईल, अशा प्रकारे पंखा लावावा.
५. थंड पाणी अथवा योग्य क्षारयुक्त पाणी (१ चमचा मीठ ५०० मि.ली. पाण्यात) प्रत्येक १५ मिनिटांनी द्यावे. (एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये.)
इ. उष्माघात (Heat Stroke) : ही उष्णतेच्या कारणाने उत्पन्न आरोग्य संकटातील आणीबाणी आहे. येथे अत्यंत तातडीने वैद्यकीय उपचार न मिळाल्यास रोगी दगावतो. यांत रुग्णाच्या शरिराच्या गाभ्याचे तापमान (Core temperature) १०४ डिग्री फॅरनहाईट किंवा त्याहून अधिक वाढलेले असते. रुग्ण खूप गोंधळलेला असणे, त्याला सभोवतालच्या परिस्थितीचे भान नसणे, त्याला आभास होणे, त्वचा गरम, लाल आणि कोरडी असणे, घाम न येणे, नाडी जलद गतीने चालणे, रक्तदाब न्यून होणे, श्वास जलद गतीने आणि वरवर चालणे, मिरगीचे झटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे यांत आढळतात.
वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत अशा रुग्णाला…
१. थंड वातावरणात हालवावे. त्याच्यावर थेट सूर्यप्रकाश येणार नाही, असे करावे.
२. त्याचे कपडे सैल करावेत.
३. थंड पाण्याने ओले केलेले टॉवेल किंवा तत्सम वस्त्रे तोंडवळा, मान, छाती, पाय आदींवर घालावीत. शक्य असल्यास सर्व अंग थंड पाण्याने पुसून घेत रहावे किंवा थंड पाण्याने स्नान घालत रहावे.
४. डोक्यावर, कपाळावर, जांघ्यांमध्ये, मनगटांवर, काखेमध्ये बर्फ ठेवावा.’
– डॉ. दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ ४. उष्माघाताची भीषणता : वर्ष २०१५ मध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांमध्ये उष्माघातामुळे १ सहस्र ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
५ अ ५. उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी करायची पूर्वसिद्धता : आपण रहात असलेल्या प्रदेशात उष्णतेची लाट येत असेल किंवा तेथे उन्हाळा अधिक तीव्र असेल, तर उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी पुढील पूर्वसिद्धता करावी.
५ अ ५ अ. घराचे छत आणि भिंती थंड ठेवणे : ‘घराला स्लॅबचे छत असेल, तर ते थंड ठेवण्याच्या पद्धतींचा वापर करता येऊ शकतो. छतावर भाजीपाला किंवा फुलझाडे लावू शकतो. त्यासाठी कुंड्या आणि वाफे यांचा वापर करता येईल. यामुळे उन्हाचा त्रास अल्प होण्यास साहाय्य होईल. घराच्या भिंतीवर वेली वाढवू शकतो. त्यामुळे भिंती काही प्रमाणात थंड रहातील.
५ अ ५ आ. खिडक्यांच्या काचांना तात्पुरते आवरण लावणे ! : घरांच्या खिडक्यांमधून कडक ऊन घरात येण्यापासून रोखण्यासाठी बाहेरून वाळाचे पडदे, कार्डबोर्ड आदी गोष्टी उन्हाळ्यातील काळासाठी आवरण म्हणून लावता येतील. तसेच ऊन रोखणार्या काचाही बसवून घेता येऊ शकतात.
५ अ ५ ई. घरात वातानुकूलित यंत्र बसवणे ! : उष्णतेच्या लाटेमध्ये घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी शक्य असल्यास वातानुकूलित यंत्र लावून घेऊ शकतो
(संदर्भ : पुस्तक – तैयारी में ही समझदारी : आपदा से बचने के सरल उपाय)
५ अ ५ उ. नवीन घर बांधतांना हे करा : ‘नवीन घर बांधतांना उष्णतेपासून रक्षण होणार्या काही गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. जाड भिंती बनवाव्यात. यासाठी ‘कॅविटी वॉल’मुळे (यात बाहेरील भिंत आणि आतील भिंत अशा २ समांतर भिंती मधे काही इंच जागा ठेवून उभारल्या जातात. त्यामुळे बाहेरील भिंती उन्हाच्या उष्णतेचा होणारा परिणाम मध्ये फट असल्याने आतील भिंतीवर होत नाही.) आतील भिंत गार राहून घरात गारवा रहातो. रंग देतांना चुना किंवा माती यांचा वापर करावा. पूर्वीच्या काळी मातीची घरे असत. त्यामुळे घरामध्ये थंडावा रहात होता. शक्य असल्यास काचांचा कुठेही वापर करू नये. घर बांधतांना या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेता येऊ शकतो.’
५ अ ६. उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी हे करा !
५ अ ६ अ. उन्हाळ्याच्या दिवसांत तोंडाला कोरड पडेपर्यंत वाट पाहू नये. साधारण तहान लागली की, लगेच आवश्यक तेवढे पाणी प्यावे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार पाण्याचे प्रमाण वेगळे असते. पाणी पिऊन समाधान होईल, तहान भागेल आणि थकवा येणार नाही, एवढ्या प्रमाणात ते प्यावे.
५ अ ६ आ. शीतकपाटातील पाणी पिणे टाळावे : शीतकपाटातील पाणी न पिता माठातले पाणी, तसेच वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले पाणी प्यावे. शीतकपाट किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो; म्हणून साधे अथवा माठातील पाणी प्यावे. काकडी, टरबूज, कलिंगड, डाळिंब अशी हंगामी फळे खावीत.
५ अ ६ इ. द्रवपदार्थाचे आवश्यक त्या प्रमाणात सेवन करावे ! : लिंबाचे सरबत, पन्हे, लस्सी, ताक, तांदळाच्या पेजेचे पाणी, ओ.आर्.एस्. (ओरल डिहायड्रेशन सोल्यूशन), नारळपाणी, कोकम सरबत, फळांचा रस आदी द्रवपदार्थ आवश्यक त्या प्रमाणात घ्यावेत. ज्यांना वैद्यांनी काही कारणास्तव अतिरिक्त द्रवपदार्थ घेऊ नका’, असे सांगितले असेल, त्यांनी किंवा यकृताचे आजार, हृदयरोग, फिट येणे आदी आजार असलेल्यांनी त्यांनी वैद्यांचा समादेश घ्यावा.
५ अ ६ ई. वाळ्याचे पाणी पिणे ! : वाळ्याच्या मुळांच्या २ जुड्या समवेत ठेवाव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्या दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे प्रतिदिन करावे. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे.
५ अ ६ उ. गडद रंग उष्णता ओढून घेतात. त्यामुळे गडद रंग नसलेले सुती आणि सैल कपडे घालावेत.
५ अ ६ ऊ. घराबाहेर जाणार असू, तर डोक्यावर टोपी, कापड बांधावे किंवा छत्री घ्यावी. तसेच उन्हापासून डोळ्यांचे रक्षण होण्यासाठीचा चष्मा (गॉगल), तसेच त्वचेसाठी सनस्क्रीन क्रीम वापरावे.
५ अ ६ ए. लहान मुले, आजारी, अधिक वजन असलेल्या व्यक्ती आणि वृद्ध यांची या काळात अधिक काळजी घ्यावी. या व्यक्तींना उष्णता सहन होत नाही. उष्णतेमुळे यांना अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे त्यांना उष्णतेची झळ लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
५ अ ६ ऐ. बाहेर काम करणार्यांनी तप्त उन्हामध्ये काम करण्याचे टाळावे. त्या वेळी विश्रांती घ्यावी.
५ अ ६ ओ. उष्माघाताचा त्रास झालेल्या व्यक्तीच्या शरिरातील तापमान न्यून करण्यासाठी कपाळावर कपड्याची पट्टी ओली करून ठेवावी. त्यात सतत पाणी घालत रहावे. भोवळ येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर लगेच डॉक्टरांना संपर्क करावा.
(संदर्भ : पुस्तक – तैयारी में ही समझदारी : आपदा से बचने के सरल उपाय)
५ अ ६ औ. ‘सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला ‘नस्य’ असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.’
५ अ ६ अं. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १०-१५ मिनिटांनंतरच पाणी प्यावे.
५ अ ६ अः. या दिवसांत शीतकपाट किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो; म्हणून साधे अथवा माठातील पाणी प्यावे.
५ अ ६ क. जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेंदी लावावी.’
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०१४)
५ अ ७. उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी हे करणे टाळा !
५ अ ७ अ. ‘घरातून बाहेर जाणे शक्यतो टाळावे. अनवाणी बाहेर जाऊ नये. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाऊ नये.
५ अ ७ आ. दुपारच्या वेळेत जेवण किंवा अन्य कोणतेही पदार्थ शिजवू नये. तसे केल्याने घरातील उष्णता वाढणे टाळता येऊ शकते. स्वयंपाकघरात अन्न शिजवतांना खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
५ अ ७ इ. चहा, कॉफी, मद्य प्राशन करणे टाळावे.
५ अ ७ ई. अधिक उष्णता प्रक्षेपित करणारे अधिक वॅटचे दिवे, हॅलोजन लावणे टाळावे.’
(संदर्भ : पुस्तक – तैयारी में ही समझदारी : आपदा से बचने के सरल उपाय)
५ अ ७ उ. ‘अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणे आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.
५ अ ७ ऊ. खमंग, कोरडे, शिळे, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसेच आमचूर, लोणचे, चिंच इत्यादी आंबट या पदार्थांमुळे पित्त वाढते. पित्त वाढल्याने उष्णतेचा त्रास वाढतो. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे.
५ अ ७ ए. शीतपेये (कोल्डड्रिंक्स), आईस्क्रीम, रसायने वापरलेले फळांचे डबाबंद रस यांचे सेवन करू नये. हे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात. यांच्या अतीसेवनामुळे रक्तधातू दूषित होऊन त्वचारोग होतात.
५ अ ७ ऐ. या ऋतूत दही खाऊ नये. त्याऐवजी साखर आणि जिरे घालून गोड ताक घेता येते.
५ अ ७ ओ. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावे. डोके आणि डोळे यांचे उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी अन् गॉगल यांचा वापर करावा.
प्लास्टिकची पादत्राणे वापरू नयेत.
५ अ ७ औ. मैथुन करणे टाळावे. करायचे झाल्यास १५ दिवसांतून एकदा करावे.
५ अ ७ अं. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी सूर्योदयानंतरही झोपून रहाणे टाळावे.’
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०१४)
५ अ ७ अः. पाळीव प्राण्याच्या बचावासाठी हे करा !
५ अ ७ अः १. पशूंना सावलीत बांधून ठेवावे आणि त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, गार आणि भरपूर पाणी द्यावे.
५ अ ७ अः २. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत त्यांच्याकडून काम करवून घेऊ नये किंवा बाहेर सोडू नये.
५ अ ७ अः ३. गोशाळा असल्यास किंवा पशूंसाठी शेड असेल, तर त्याचे छत गार रहाण्यासाठी प्रयत्न करावा. छतावर नारळाच्या झाडाच्या झावळ्या, ओले गवत ठेवून ते पाण्याने भिजवल्याने छत गार रहाते.
५ अ ७ अः ४. शक्य असल्यास तेथे पंखा आणि कूलर लावू शकतो.
५ अ ७ अः ५. उष्णता अधिक वाढल्यास प्राण्यांवर पाण्याचा शिडकावा करावा.
(संदर्भ : पुस्तक – तैयारी में ही समझदारी : आपदा से बचने के सरल उपाय)
भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
हा लेख www.sanatanprabhat.org आणि www.sanatan.org या संकेतस्थळावर वाचा ! |