छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या व्हिडिओ प्रकरणी श्री श्री रविशंकर यांना पुणे पोलिसांची नोटीस !

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर

पुणे, ५ मार्च – आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदासस्वामी असल्याचे दर्शवणारा व्हिडिओ यू-ट्यूब चॅनलवर प्रसारित केल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. याविषयी कारवाई करावी, यासाठी संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे सातत्याने पाठपुरावा करत होते. यासंदर्भात श्री श्री रविशंकर यांना पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी नोटीस बजावली आहे, तसेच त्यांना ३० दिवसांमध्ये नोटिशीचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना यापूर्वी निवेदन दिले आहे. (आज संपूर्ण विश्‍वात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने गुरु-शिष्य परंपरेत घेतले जाते. तसे ऐतिहासिक दस्तऐवज भारतीय पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर या ठिकाणी उपलब्ध आहेत; पण दुर्दैवाने या सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष करून काही पुरो(अधो)गामी आणि परिवर्तनवादी विनाकारण गुरु-शिष्य या नात्यावर आक्षेप घेत स्वतःचे घोडे पुढे दामटणे अयोग्य आहे, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते. – संपादक)