सत्ताधार्यांना एका रुपयाचाही भ्रष्टाचार करू देणार नाही ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप
सांगली, ५ मार्च (वार्ता.) – सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधकांनी घोडेबाजार करून महापालिकेतील सत्ता हस्तगत केली असली, तरी कारभारात सत्ताधार्यांना एका रुपयाचाही भ्रष्टाचार करू देणार नाही. महापालिकेतील आणि रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी आम्हाला नागरिकांची साथ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ज्याला करेक्ट कार्यक्रम म्हणते तो घोडेबाजार सर्वच जनतेला मान्य नसून आगामी काळात जनताच उत्तर देईल, अशी चेतावणी भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी दिली आहे.
या संदर्भात माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी दिला. महापालिका स्थापनेपासून इतका मोठा निधी विकासकामांना कधीही मिळाला नव्हता. सत्तेत आल्यानंतर भाजपने कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व पक्षांच्या नगरसेवकांना समान निधीच्या माध्यमातून भाजपने महापालिका क्षेत्रातील विकासकामांना गती दिली होती. महापालिका, जिल्हा परिषद, बाजारसमिती यांसारखी सत्तेची ठिकाणे हातातून गेल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घोडेबाजार करून नगरसेवक फोडले आणि सत्ता मिळवली.