नोकरीसाठी महापालिकेचे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा नोंद !
संभाजीनगर – महापालिका प्रशासन आणि राज्य अग्नीशमन कार्यालयाच्या नावे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध केल्याप्रकरणी १२ जणांवर सिटी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या भ्रमणभाषवर आलेल्या एका नियुक्ती पत्राद्वारे हा प्रकार उघडकीस आला. नियुक्ती पत्र दिलेल्या १२ जणांचा शपथविधी १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता होईल. त्यास राज्यातील अनेक मंत्री उपस्थित रहातील, असे या पत्रात म्हटले होते. बनावट नियुक्ती पत्र सादर केल्याप्रकरणी अग्नीशमन विभागाचे प्रमुख आर्.के. सुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महापालिकेच्या लेटरहेडवर १२ जणांना अग्नीशमन विभागात नोकरी देण्यात आल्याचे बनावट नियुक्ती पत्र सिद्ध करण्यात आले. त्यावर प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांची बनावट स्वाक्षरीही करण्यात आली आहे, तसेच लेटरहेडवर असलेला आवक-जावक क्रमांकही खोटा असून, या पत्राची माहिती आयुक्तांना व्हॉट्सअॅपवर मिळाली होती. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्याचे आदेश दिले.