प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक
बेळगावमधील मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला मंदिर विश्वस्त आणि हिंदु संघटना यांचा तीव्र विरोध !
बेळगाव (कर्नाटक), ५ मार्च (वार्ता.) – बेळगाव जिल्ह्यातील १६ मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी घेत त्या मंदिरांना नोटिसा पाठवल्या आहेत. या अन्यायकारक निर्णयाला बेळगावमधील समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा तीव्र विरोध आहे. या निर्णयाच्या विरोधात हिंदु समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. मशिदी आणि चर्च यांच्या व्यवस्थेत देशभरात कोणतेच प्रशासन हस्तक्षेप करत नाही; मात्र हिंदु मंदिरांवर प्रशासक नेमला जातो, हीच आजची ‘धर्मनिरपेक्षता’ आहे का ? असा परखड प्रश्न उपस्थित करत ‘प्रशासक नेमणे तर दूरच, राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे ही पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, तसेच येत्या १५ दिवसांत बेळगावमधील मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू’, अशी चेतावणी देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटकचे प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी दिली. ते ५ मार्च या दिवशी महासंघ आणि बेळगावमधील मंदिर विश्वस्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या संदर्भात बेळगाव येथील प्रशासक नेमलेल्या विविध मंदिरांचे विश्वस्त, देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक यांच्या पदाधिकार्यांची बैठक श्री अंबाबाई देवस्थानात पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
अन्य विश्वस्तांनी व्यक्त केलेली भूमिका
मशिदी आणि चर्च यांना वगळून केवळ हिंदु मंदिरांना नोटिसा देणे, हा हिंदूंशी केलेला भेदभाव ! – अशोक चव्हाण
मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी तात्काळ मागे घ्यावा. मंदिरांवर प्रशासक नेमणे, ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी आहे. त्यामुळे मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. आज १६ मंदिरांवर नेमले, उद्या आणखी २८ मंदिरांवर प्रशासक नेमण्याची सिद्धता चालू असल्याची आमची माहिती आहे. मशिदी आणि चर्च यांना वगळून केवळ हिंदु मंदिरांना नोटिसा देणे, हा हिंदूंशी केलेला भेदभाव आहे. यासंदर्भात आम्ही या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.
श्री. सुरेश रामचंद्र कित्तूर – यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना पुष्कळ दुखावल्या आहेत.
श्री. अनिल चौधरी – धर्माची व्याख्या सरकारने काय केली आहे ? सरकारने आम्हाला आमचा धर्म सांगण्याची आवश्यकता नाही. मधमाशीच्या पोळ्याला दगड मारल्यावर माशा ज्याप्रमाणे चवताळून उठतात, त्याप्रमाणे हिंदूंनी चवताळून उठणे आवश्यक आहे आणि हे आक्रमण परतवून लावावे.
धर्मादाय आयुक्तांना निर्णय मागे घ्यायला भाग पाडू ! –
सर्वच क्षेत्रांत उद्योगांचे खासगीकरण केले जात आहे; मात्र मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे काम प्रशासन करत आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता. त्याला राज्यातील सर्व मंदिर विश्वस्त आणि धार्मिक संस्था यांनी संघटितरित्या तीव्र विरोध केला; परिणामी साडेचार लाख मंदिरे अन् धार्मिक संस्था यांच्या सरकारीकरणाचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला. येथेही आपण तीव्र विरोध करू आणि धर्मादाय आयुक्तांना हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.
पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी महाराष्ट्रात झालेल्या मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम सांगून ‘बेळगाव येथील मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयासही संघटितपणे विरोध करू’, असे सांगितले.
👉 ಬೆಳಗಾವಿಯ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯನ್ನು ನೇಮಿಸುವ ನಿರ್ಣಯಕ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನ ವಿಶ್ವಸ್ಥರು ಹಾಗೂ ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆಗಳಿಂದ ತೀವ್ರ ವಿರೋಧ…
Posted by Hindu Janajagruti Samiti Bengaluru on Friday, March 5, 2021
क्षणचित्रे
१. ४ मार्च या दिवशी मंदिर विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर तातडीने ५ मार्च या दिवशी पत्रकार परिषद घेण्याचे ठरले. असे असतांना पत्रकार परिषदेसाठी ४६ मंदिर विश्वस्त आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
२. ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघाच्या नेतृत्वात आम्ही हुबळी, तसेच अन्य ठिकाणी आंदोलन करू’, असे अनेक विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विशेष
५ मार्च या दिवशी पत्रकार परिषद आहे, असे समजल्यावर मोदगे-दड्डी येथील श्री भावेश्वरी मंदिराचे ५ विश्वस्त ४० किलोमीटर लांबून आणि त्यांना कोणताही निरोप नसतांना श्री. गुरुप्रसाद गौडा आणि श्री. सुनील घनवट यांना भेटण्यासाठी आले होते.
पत्रकार परिषदेला उपस्थित पदाधिकारी
बेळगाव येथील ‘श्री अंबाबाई देवस्थान’चे अध्यक्ष श्री. अशोक चव्हाण; श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र, टिळकवाडीचे विश्वस्त श्री. दिनेश पटेल; श्री बनशंकरी देवस्थानचे विश्वस्त श्री. सुरेश कित्तूर; बनशंकरी मंदिराचे व्यंकटेश वनहळ्ळी; श्री जिवेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री. भालचंद्र चौधरी; श्री अंबाबाई मंदिराचे सदस्य श्री. अनिल चौधरी; बाजार गल्ली वडगाव येथील अंबाबाई मंदिराचे विश्वस्त विष्णु महेंद्रकर, देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटकचे राज्य प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद गौडा; ‘महाराष्ट्र मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे बेळगाव समन्वयक श्री. हृषीकेश गुर्जर यांसह विविध मंदिरांचे पदाधिकारी उपस्थित होते.