मद्यालये, बार आदींना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कायदा करावा !
शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची अशासकीय विधेयकाद्वारे विधान परिषदेत मागणी
|
श्री. सागर चोपदार, विशेष प्रतिनिधी
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – मद्यालये, बार आदींना परवाना देतांना काही नियम आहेत; मात्र कायदा नसल्यामुळे नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. मद्यालये, बिअर बार, वाईन शॉप, परमिट रूम, देशी आणि विदेशी मद्य विक्री केंद्र, हॉटेल्स, उपाहारगृहे यांना देवता, संत, महात्मे, राष्ट्रपुरुष यांची नावे दिली जातात, तसेच त्यांच्या चित्रांचाही उपयोग केला जातो. अशा प्रकारे नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी ५ मार्च या दिवशी अशासकीय विधेयकाद्वारे विधान परिषदेत केली.
१. याविषयीचे गांभीर्य सभागृहात विशद करतांना डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, हा विषय नवीन नाही. यावर पूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. बिअर बार किंवा वाईन शॉप यांना नाव देतांना कनकदुर्गा, व्यंकटेश्वरा, साईबार, मारुती वाईन्स आदी देवतांची नावे दिली जातात. काही ठिकाणी देवतांच्या मूर्तींचाही उपयोग केला जातो.
२. केंद्रशासनाच्या ‘व्यापार चिन्ह कायदा १९९९’ मधील कलम ९ (२ ब) नुसार व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रीत करणे, हा गुन्हा आहे. अशा प्रकारे राज्यशासनानेही कायदा करावा.
३. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मद्यालये, बिअर बार, वाईन शॉप यांना देवता, संत, महात्मे, राष्ट्रपुरुष यांप्रमाणे किल्ल्यांची नावेही देण्यात येऊ नयेत, अशी मागणी केली.
पुढील अधिवेशनात विधेयक चर्चेला येण्याची शक्यता
आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या या अशासकीय विधेयकावर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घ्यावे का ? यासाठी सभागृहात मतासाठी ठेवले. ‘हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घेण्यात यावे’, यावर सभागृहात बहुमताने संमती देण्यात आली. त्यामुळे हे विधेयक पुढील अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.