काम बंद असतांना पाण्याचे नमुने घेऊन अहवाल सादर करणार्या पुरातत्व विभागाला नमुने पुन्हा घेऊन अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश
बाणगंगेचा जलस्रोत बाधित झाल्याचे प्रकरण
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – ‘हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम यांनी निर्माण केल्याचा इतिहास असलेला वाळकेश्वर येथील बाणगंगेचा जलस्रोेत विकासकांनी केलेल्या खोदकामामुळे बाधित झाला आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागाने काम बंद असतांना जलस्रोतातील पाण्याचे नमुने घेऊन मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. यावर गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे काम चालू असतांना पाण्याचे नमुने घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले आहेत.
१ मार्च या दिवशी याविषयीची सुनावणी झाली.
१. बाणगंगेपासून काही अंतरावर विकासकांकडून करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे बाणगंगेचा जलस्रोेत बाधित झाला आहे.
२. खोदकामामुळेच बाणगंगेमध्ये येणार्या जलस्रोतातून चिखलमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे या कामाला स्थगिती द्यावी, यासाठी गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टद्वारे मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुरातत्व विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सादर केलेल्या अहवालामध्ये बाणगंगेमध्ये येणारा जलस्रोेत चिखलमिश्रित नसल्याचे नमूद केले आहे.
३. पुरातत्व विभागाने सादर केलेला अहवाल न्यायालयाने प्रथमदर्शी मान्य केला आहे; मात्र पाण्याचे नमुने काम बंद असतांना घेण्यात आल्याचा आक्षेप गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टने घेतला आहे.
४. यावर काम चालू असतांना पाण्याचा नमुना घेण्याचे निर्देश न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले आहेत.
५. बाणगंगा ही संरक्षित वास्तू असल्यामुळे त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व पुरातत्व विभाग अन् मुंबई महानगरपालिका यांचे आहे. त्यामुळे बाणगंगेच्या परिसरात बांधकाम त्यांनी नियंत्रित करावे. बाणगंगेच्या परिसरात बांधकामाला अनुमती देतांना नियमांचे पालन होत आहे ना ? याविषयी पडताळणी करावी, अशी मागणी गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टकडून न्यायालयात करण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मार्च या दिवशी होणार आहे.