गोध्रा प्रकरणात नरेंद्र मोदी यांना कोणत्याही अहवालामध्ये दोषी ठरवण्यात आलेले नाही ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – गुजरातमधील गोध्रा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय संबंध ? मोदी त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षा पुरवण्याचे काम केले. नरेंद्र मोदी यांना गोध्रा प्रकरणात कोणत्याही अहवालामध्ये दोषी ठरवण्यात आलेले नाही, असे विधान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे आणीबाणीची क्षमा मागितली, त्या प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणी क्षमा मागावी’, असे वक्तव्य केले. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वरील प्रतिपादन केले.
या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘लाथ मारायची आणि क्षमा मागायची, ही काँग्रेसची वृत्ती आहे. आणीबाणीमध्ये लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, सहस्रावधी लोक कारागृहात गेले आणि आता राहुल गांधी सांगत आहेत, ‘माझ्या आजीची चूक झाली’ आणि गोध्राशी तुलना करता ? नरेंद्र मोदी दोषी असते, तर ते पंतप्रधान झाले नसते. मोदींवर आरोप करण्यात आले, त्यांची चूक नाही, मग त्यांनी कशाची क्षमा मागायची ?’’