५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. रुक्मिणी जाधव (वय १ वर्ष) !
माघ कृष्ण पक्ष पंचमी (३.३.२०२१) या दिवशी चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी यांनी बाळावर संस्कार होण्यासाठी केलेले विविध भावप्रयोग आणि अन्य अनुभूती आपण ५ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/456432.html
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
४. वय ४ ते ८ मास
४ इ. रुक्मिणीचा स्वभाव शांत असल्यामुळे प्रतिदिन २ घंटे बेकरीमध्ये सेवा करता येणे
रुक्मिणीचा सकारात्मक प्रतिसाद आणि शांत स्वभाव यांमुळे ती सहा मासांची झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील बेकरीमध्ये सेवेला जाऊ लागले. मी बेकरीमध्ये सेवेला जाऊ लागल्यावर ‘माझ्या सेवेत व्यत्यय येऊ नये’, यासाठी मी रुक्मिणीला सांगितलेल्या सूचनांप्रमाणेच तिची कृती व्हायची. जणू मी सांगितलेले तिला सर्व समजत होते. तिच्यामुळे माझ्या सेवेत कुठलाही व्यत्यय न येता माझी सेवा चांगली होत असे. माझी २ घंटे सेवा पूर्ण होईपर्यंत ती शांतपणे झोपायची किंवा खेळत रहायची.’
४ उ. दळणवळण बंदीमुळे रुक्मिणीसाठी बाहेरून कपडे किंवा खेळणे आणू न शकणे आणि एका संतांनी तिला भेट म्हणून खेळणे दिल्यावर भावजागृती होणे
‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या दळणवळण बंदीमुळे मला रुक्मिणीसाठी कपडे आणि एखादेही खेळणे आणता आले नाही. अत्यावश्यक असलेले कपडे घेऊन मी रामनाथीला आले होते; परंतु येथे आल्यावर तिच्यासाठी साधकांनी दुपटी, लंगोट, फ्रॉक आणि इतर कपडे स्वतःहून आणून दिले. मी तिला रिकामी कापराची डबी, अत्तराची बाटली अथवा स्प्रेची बाटली खेळण्यासाठी द्यायचे. त्याच्याशी ती आनंदाने खेळायची. एकदा मला ‘आपण तिला खेळणी घेऊ शकलो नाही’, याचे फार वाईट वाटले. त्यानंतर २ – ३ दिवसांनी एका संतांशी झालेल्या भेटीत त्यांनी तिला भेट म्हणून खेळणे दिले. अशा प्रकारे तिला पहिले खेळणे संतांकडूनच मिळाले. तेव्हा खरोखरच ‘देवाचे तिच्याकडे किती लक्ष आहे !’, हे लक्षात येऊन माझी भावजागृती झाली. त्यानंतर आश्रमातील एका साधिकेकडूनही रुक्मिणीला खेळणी मिळाली.
५. वय ९ ते १२ मास
५ अ. परिस्थितीशी सहज जुळवून घेणारी रुक्मिणी !
५ अ १. काही दिवसांनी रामनाथीहून सातार्याला जायचे ठरवणे आणि सातार्याला गेल्यावर आजी-आजोबांशी ओळख नसतांनाही त्यांच्याशी लगेच खेळू लागणे : रामनाथीला काही दिवस राहिल्यानंतर आम्ही घरी सातार्याला जायचे ठरवले. रामनाथीहून घरी जातांना आम्हाला वाटले, ‘रुक्मिणीला इकडे एवढ्या साधकांची सवय झाली आहे. घरी आता आम्ही चौघेच असणार. शिवाय आजी-आजोबा तिच्यासाठी एकदम नवीन आहेत. त्यामुळे ती तेथे राहील का ?’; पण रुक्मिणी दुसर्या दिवसापासूनच त्यांच्याशी खेळू लागली. आम्ही घरी ३ मास राहिलो.
५ अ २. आगगाडीचा पहिला प्रवास न रडता आनंदाने करणे : त्यानंतर या वेळी घरून रामनाथीला येतांना काही अडचणीमुळे मला आणि रुक्मिणीला थोडे दिवस मिरज आश्रमात रहायला जाण्यास सांगितले होते. घरून आम्ही आगगाडीने मिरजेला जायला निघालो. तेव्हा ‘रुक्मिणीचा हा पहिलाच आगगाडीचा प्रवास आहे. ती रडेल का ? त्रास देईल का ?’, असे मला वाटत होते; पण आगगाडीत बसल्यावर काही वेळाने ती आजूबाजूच्या सहप्रवाशांकडे पाहून स्वतःहून हसत होती. त्यांना ‘टाटा’ करत होती. माझ्या समोरील बाकावर दोन-अडीच वर्षांचा एक मुलगा बसला होता. रुक्मिणी त्याच्याशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही मिरजेला उतरल्यावर ती डब्यातील सर्वांकडे बघून टाळ्या वाजवत होती आणि हसून हात हालवून ‘टाटा’ करत होती. तिच्या या गुणामुळे सर्व जण तिच्याकडे आकर्षित झाले होते.
५ आ. रुक्मिणीविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
५ आ १. उत्तम आरोग्य : जन्मापासून तिच्या आरोग्याविषयी कसलीच तक्रार नाही. ती रात्रीही अतिशय शांत झोपते. तिच्यामुळे मला किंवा इतर कुणालाही कधीच रात्री जागरण झाले नाही कि कधी झोपमोड झाली नाही. ही गुरुकृपाच आहे.
५ आ २. आनंदी : ती सतत हसतमुख आणि आनंदी असते. ती स्वतःहून इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि सर्वांना आनंदाने हसून प्रतिसाद देते.
५ आ ३. उत्तम आकलनक्षमता
अ. मिरज आश्रमात आल्यावर रुक्मिणीला ध्यानमंदिरात नेल्यावर काहीही न सांगता तिने देवता, प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या प्रतिमा बघून स्वतःहून नमस्कार केला.
आ. प्रार्थना आणि कृतज्ञता यांची उद्घोषणा झाल्यावर किंवा शंख वाजल्यावर ती नमस्कार करते.
इ. साधक प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यापूर्वी प्रार्थना करतात. हे बघून तीही आता जेवणापूर्वी हात जोडून नमस्कार करते.
ई. रुक्मिणीने कुठलीही गोष्ट १ – २ वेळा बघितली, तरी तिला लगेच त्याचे आकलन होते आणि ती तशी कृती करण्याचा प्रयत्न करते. मी घरी असतांना सायंकाळी अग्निहोत्र करतांना तिला माझ्या समवेत घेऊन बसत होते. आरंभी ती आहुती देण्यासाठी घेतलेल्या अक्षता तोंडात घालायची; पण त्यानंतर ‘मी अक्षता अग्निहोत्रात घालते’, हे तिने बघितले. आता तीही अक्षता अग्निहोत्रात घालते.
५ आ ४. तिची खाण्या-पिण्याविषयी कसलीच तक्रार नाही.
५ आ ५. तिला राम आणि कृष्ण यांची भजने आवडतात. त्या वेळी ती आनंदाने टाळ्या वाजवते.
५ ई. चि. रुक्मिणीची दैवी शारीरिक वैशिष्ट्ये !
१. आम्ही रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांनी ‘रुक्मिणीच्या डोळ्यांचा रंग विष्णुतत्त्वाप्रमाणे निळसर आहे’, असे माझ्या लक्षात आणून दिले.
२. तिच्या केसांमध्ये पुढील बाजूस भोवरा असून त्याचा आकार शंखाप्रमाणे आहे. आजपर्यंत केसाच्या पुढच्या भागांत कुणालाही भोवरा असल्याचे माझ्या निदर्शनास आलेे नाही. रुक्मिणीच्या केसांत मध्याच्या वरती भोवरा असून त्याचा आकारही शंखाप्रमाणे आहे.
३. तिच्या पोटाच्या त्वचेवर मधोमध सप्तचक्रे असतात, तेथे पांढरी रेषा दिसू लागली आहे. त्यामुळे तिच्या पोटाकडे बघितल्यावर अर्धनारी नटेश्वराची आठवण होते.
५ उ. ‘बाळाच्या पत्रिकेत सर्व ग्रह उच्च स्थानी असून बाळामुळे तुमचीही उत्तरोत्तर प्रगती होणार’, असे ज्योतिषांनी सांगणे
‘ज्योतिषशास्त्रानुसार रुक्मिणीच्या पत्रिकेतील सर्व ग्रह उच्च स्थानी असून तिच्या भाग्याने आमचीही उत्तरोत्तर प्रगती होणार’, असे ज्योतिषांनी सांगितले. त्या वेळी एक विशेष गोष्ट माझ्या लक्षात आली. रुक्मिणीसाठी कुठलीही गोष्ट करतांना ती आपोआप आणि सहजतेने होते. आम्हाला त्यासाठी अधिक काही करावे लागत नाही.
५ ऊ. रुक्मिणीच्या सहवासात आलेल्या अनुभूती
१. रुक्मिणीच्या सहवासात असतांना माझ्यावर कधीही आवरण आल्याचे जाणवत नाही. उलट तिच्यामुळे चैतन्यच मिळत असल्याचे जाणवते.
२. तिच्या सहवासात मन सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर रहाते.
६. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, या सर्व प्रसंगामधून रुक्मिणीला सांभाळण्याविषयीचा आमचा सर्व कर्तेपणा आपोआप गळून जात आहे. ती आपली आहे आणि आपणच तिचा सर्व परीने सांभाळ करत आहात. एक चांगले माध्यम बनून आम्हाला त्यातून आमची साधना करून घेता येण्यासाठी शक्ती द्या’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.’
– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२१)
(समाप्त)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या बोधवचनाची साधिकेला आलेली अनुभूती !१. समाजातील इतर गरोदर महिलांप्रमाणे खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेता न येणे : ‘गरोदरपणात सातव्या मासापर्यंत मी देहली सेवाकेंद्रात सेवारत होते. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यासाठी किंवा बाळ गोरे होण्यासाठी समाजातील इतर महिला खाण्या-पिण्याची जशी विशेष काळजी घेतात, तशी कुठलीच काळजी मला घेता आली नाही किंवा वेगळा असा काहीच आहार घेतला नाही. २. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘आहार कुठला आहे ?’, यापेक्षा तो कुठल्या वातावरणात आणि कुठल्या भावाने ग्रहण करतो ?’, हेच महत्त्वाचे आहे’, असे सांगणे, त्यानंतर ‘सेवाकेंद्रातील प्रसाद आणि महाप्रसाद हे अमृत असून त्यानेच तुझी सर्वांगीण वाढ होईल’, असे गर्भाला सांगणे अन् प्रत्यक्षातही बाळाचे वजन चांगले आणि रंगही गोरा असणे : त्याच सुमारास एकदा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी आहाराच्या संदर्भात एक सूत्र सांगितले. ते म्हणाले, ‘‘अलीकडचा समाज खाण्या-पिण्याविषयी अधिक सतर्क राहू लागला आहे. विदेशातील संस्कृतीमुळे त्याची विचारसरणी आहाराविषयीच्या काळजीने ग्रस्त झाली आहे; परंतु सत्य हेच आहे की, ‘आपण काय आणि कसा आहार घेतो ?’, यापेक्षा कुठल्या वातावरणात अन् कुठल्या भावाने तो ग्रहण करतो ?’, यालाच अधिक महत्त्व आहे. त्यांचे हे अमृतवचन माझ्या हृदयात कोरले गेले. त्या क्षणापासून मी गर्भातील बाळाला प्रत्येक वेळी सांगायचे, ‘सेवाकेंद्रातील प्रसाद आणि महाप्रसाद हे आपल्यासाठी अमृत आहे. त्यातून मिळणार्या देवाच्या चैतन्यानेच तुझी सर्वांगीण वाढ आणि विकास होईल. त्यासाठी तूही देवाला प्रार्थना करून हा प्रसाद नामजपासाहित ग्रहण कर.’ बाळाच्या जन्मानंतर ‘आहाराची कुठलीही विशेष काळजी न घेताही बाळाचे वजन चांगले आहे आणि रंगही गोरा आहे’, असे माझ्या लक्षात आले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांच्या या बोधवचनाची प्रत्यक्ष अनुभूतीच देवाने मला दिली. ‘हे गुरुमाऊली, गरोदरपणात मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांचा अधिकाधिक सत्संग आपल्याच कृपेने लाभू शकला’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’ – सौ. स्वानंदी अविनाश जाधव |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |