नम्र, तळमळीने सेवा करणारे आणि सतत कृतज्ञताभावात असलेले सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंत (वय ८३ वर्षे) !
सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमातील साधिका कु. नलिनी राऊत आणि श्रीमती रत्नप्रभा कदम या पूर्वी ठाणे सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करत होत्या. त्या वेळी पू. सदाशिव सामंतकाका सेवेनिमित्त ठाणे सेवाकेंद्रात येत असत. तेव्हा कु. नलिनी राऊत आणि श्रीमती रत्नप्रभा कदम यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. सदाशिव सामंतकाका यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्ण नमस्कार !
१. ‘पू. सामंतकाका लहान-थोर सर्वांशीच नम्रतेने बोलतात.
२. साधी रहाणी
पू. काका ‘ग्लॅक्सो’ या मोठ्या औषधाच्या आस्थापनेत उच्चपदस्थ अधिकारी होते, तरीही त्यांची रहाणी अत्यंत साधी आहे.
३. अहं अल्प असणे
पू. काकांना २ विवाहित मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी अमेरिकेत असते. धाकटी मुलगी उच्च शिक्षित असून तिचे यजमान सैन्यात मोठ्या पदावर आहेत. काकू महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या; परंतु याविषयी मोठेपणाने कुणालाही काही सांगतांना मी त्यांना कधी पाहिले नाही.
४. इतरांना साहाय्य करणे
४ अ. पत्नीला सेवेत साहाय्य करणे : पू. काकांच्या घरी रुग्णाईत वयोवृद्ध आत्या रहात असत. पू. काका सेवाकेंद्रातील त्यांची सेवा संपवून घरी जाईपर्यंत काकू घरातील सर्व कामे आटोपून घ्यायच्या आणि पू. काका घरी आल्यावर त्या प्रसारसेवेला जायच्या. काका घरी जाईपर्यंत काकू आत्यांची काळजी घ्यायच्या आणि काकू प्रसाराला गेल्यानंतर काका आत्यांचे हवे-नको ते पहायच्या. अशा प्रकारे ते आत्यांना आनंदाने सांभाळत पत्नीला सेवेला जाण्यास साहाय्यही करत असत.’ – कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४ आ. रुग्णाईत साधिकेला साहाय्य करणे : ‘ठाणे सेवाकेंद्रात असतांना माझ्या कमरेच्या मणक्याची झीज झाली असल्यामुळे मला नीट चालता येत नव्हते. तेव्हा पू. काकांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. ते स्वतः मला अल्पाहार, चहा आणि महाप्रसाद वाढून देत असत. मला चालता येत नसतांना ते माझा हात धरून काळजीपूर्वक मला अल्पाहार आणि चहा घेण्यासाठी घेऊन जात असत.’ – श्रीमती रत्नप्रभा कदम, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
५. शिकण्याची वृत्ती
‘पू. काकांना पूर्वी धोतर नेसता येत नसे. ‘धोतर नेसल्यामुळे सात्त्विकता निर्माण होते आणि धोतर नेसून आरती केल्यास अधिक चैतन्य ग्रहण करता येते’, हे समजल्यानंतर पू. काकांनी धोतर नेसणे शिकून घेतले. नंतर त्यांनी प्रतिदिन धोतर नेसून पूजा आणि आरती करणे चालू केले होते.’ – कु. नलिनी राऊत
६. सेवेची तळमळ
६ अ. ब्राह्ममुहूर्तावर उठून नामजप करणे, पत्नीला घरकामात साहाय्य करणे आणि पूजेच्या सेवेसाठी सेवाकेंद्रात येणे : ‘पू. काका घरी रहात असतांनाही ठाणे सेवाकेंद्रात देवपूजेसाठी नियमित यायचे. ते उत्तररात्री ३ वाजता उठून नामजप करायचे, तसेच घरात पत्नी सौ. दिनप्रभा सामंत यांना थोडेफार साहाय्य करायचे, उदा. घरातील थोडीफार स्वच्छता, देवपूजा आणि आरती. त्यानंतर ते स्वतःचे सर्व आवरून आनंदाने आणि उत्साहाने सकाळी ७ वाजता ठाणे सेवाकेंद्रात सेवेसाठी उपस्थित रहात असत. हा त्यांचा नित्य दिनक्रम होता. त्यांच्या तोंडवळ्यावर कधीही थकवा जाणवत नसे.’ – श्रीमती रत्नप्रभा कदम
६ आ. ठाणे सेवाकेंद्रापासून घर लांब असूनही प्रतिदिन घरून सेवाकेंद्रात येऊन भावपूर्णरित्या पूजा करण्याची सेवा करणे : पू. काका प्रतिदिन सकाळी ठाणे सेवाकेंद्रात येऊन ध्यानमंदिरातील देवतांची पूजा आणि आरती करायचे. त्यांचे घर ठाणे सेवाकेंद्रापासून साधारण ५ कि.मी. अंतरावर होतेे. ते सेवाकेंद्रात बसने प्रवास करून येत असत. त्या वेळी सकाळच्या शाळेत जाणारी मुले आणि शिक्षक यांची बसमध्ये चढण्यासाठी गर्दी होत असे. त्यामुळे पू. काकांना बर्याचदा उभे राहून प्रवास करावा लागत असे. प्रसंगी बस न मिळाल्यास ते रिक्शानेही सेवाकेंद्रात येत असत; परंतु ‘सेवाकेंद्रात सेवेला येण्याचा आपल्याला त्रास होतो’, अशी तक्रार त्यांनी कधीही केली नाही. सेवाकेंद्रात आल्यानंतर ते ध्यानमंदिराची स्वच्छता आणि पूजेची सिद्धता करून पूजा अन् आरती करत असत. या सर्व सेवा ते आनंदाने आणि भावपूर्णरित्या करत असत.
६ इ. पूजेची सेवा झाल्यावर अल्पाहाराची सिद्धता करण्यासाठी साहाय्य करणे : आरती झाल्यानंतर अल्पाहार सिद्ध नसल्यास त्याची सिद्धता करण्यासही ते साहाय्य करत असत. अल्पाहार केल्यानंतर अल्पाहाराची भांडी घासण्यासही ते साहाय्य करत असत. त्यांना ‘नको’, असे सांगितल्यावर ते म्हणत, ‘‘तुम्ही दिवसभर सेवाकेंद्रात असता. तुम्हाला दिवसभर सेवा असते. मी थोडा वेळच असतो, तर मला सेवा करू द्या.’’ त्या वेळी पू. काकांचे वय ७० वर्षे होते, तरीही या वयातील त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. त्यांचा उत्साह पाहून आम्हालाही सेवा करण्याची प्रेरणा मिळत असे.’ – कु. नलिनी राऊत
७. केवळ सात्त्विक उत्पादनांचे वितरण न करता जिज्ञासूंना साधनाही सांगणे
‘पू. काका ठाणे सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यानंतर त्यांना सेवाकेंद्रातील सात्त्विक उत्पादनांच्या वितरणाची सेवा दिली होती. ती त्यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळली. ते हिशोबात नेहमी चोख असायचे. ठाणे सेवाकेंद्रात जिज्ञासू सनातनची सात्त्विक उत्पादने घेण्यासाठी आल्यावर पू. काका त्यांना सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगून त्या समवेत साधनाही सांगायचे. त्याप्रमाणे साधना केल्याने जिज्ञासूंना अनुभूतीही यायच्या. ते जिज्ञासू पुन्हा सेवाकेंद्रात सात्त्विक उत्पादने घेण्यासाठी यायचे, तेव्हा त्यांना पू. काकांना भेटायचेही असायचे. त्या वेळी पू. काका घरी गेलेले असल्यास जिज्ञासू ‘काका आहेत का ? ते कधी येणार आहेत ?’, असे आवर्जून विचारायचे. त्या वेळी जिज्ञासू सांगायचे, ‘‘काका आम्हाला साधना आणि नामजप सांगतात. त्यामुळे आम्हाला चांगले वाटते.’’ त्यांना भेटण्यासाठी जिज्ञासू पुनःपुन्हा सेवाकेंद्रात यायचे.’ – श्रीमती रत्नप्रभा कदम
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा
‘मला कधी काही अडचण आली, तर पू. काका नेहमी मला सांगत, ‘‘ताई काही काळजी करू नका. सर्वकाही ठीक होईल. परम पूज्य आहेत ना !’’ – कु. नलिनी राऊत
९. कृतज्ञताभाव
‘ते सतत कृतज्ञताभावात असतात. त्यांनी सहज जरी कुणाकडे पाहिले, तरी त्यांचे हात आपोआप जोडले जातात. ते ठाणे सेवाकेंद्रात येत असल्यापासून त्यांच्यामध्ये असलेला कृतज्ञताभाव मी पहात आहे. पू. काकांंमुळे आम्हा साधकांनाही ‘नमस्कार’ म्हणण्याची सवयच लागली आहे.’ – श्रीमती रत्नप्रभा कदम
‘पू. सामंतकाकांची गुरुमाऊलींप्रती असलेली अढळ श्रद्धा, भाव आणि भक्ती त्यांना संतपदापर्यंत घेऊन गेली’, असे वाटते. असे हे अनमोल संतरत्न दिल्याविषयी गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ – कु. नलिनी राऊत (१०.८.२०१९)
पू. सदाशिव सामंतआजोबा बाजूने चालत जात असतांना ‘ते स्वर्गात आहेत’, असे वाटणे, ‘आश्रम म्हणजे स्वर्ग आहे आणि सर्व साधक स्वर्गात आहेत’, असे जाणवणे अन् त्या वेळी आनंद होऊन भाव जागृत होणे‘मी भोजनकक्षात पटलावर बसले होते आणि पू. सदाशिव सामंतआजोबा बाजूने चालत जात होते. माझे त्यांच्याकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांच्याकडे पाहून मला काहीतरी वेगळेच वाटत होते. मला काहीच समजत नव्हते; म्हणून मी देवाला विचारले, ‘देवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), मला वेगळे का वाटत आहे ?’ तेव्हा मला जाणवले, ‘पू. सामंतआजोबा भूमीवर किंवा पृथ्वीवर नाहीत, तर ते स्वर्गात आहेत.’ तेव्हा मला काही मिनिटे आजूबाजूचे काही दिसत नव्हते. त्या वेळी ‘आश्रम म्हणजे स्वर्ग आहे आणि मी अन् सर्व साधक स्वर्गात आहोत, तसेच सर्व देवता बाजूला आहेत’, असे मला दिसत होते. ‘पू. आजोबा चालत नसून ते अधांतरी जात आहेत’, असे मला दिसत होते. त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली आणि ‘देवाने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) आपल्याला कुठून कुठे आणले ?’, या गोष्टीचा आनंद होऊन माझा भाव जागृत झाला.’ – सौ. नीला रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल (९.११.२०१९) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |