वसतीगृहातील महिलेसमवेत अपप्रकार केल्याच्या घटनेत तथ्य नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
जळगाव येथील आशादीप वसतीगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर !
विधानसभेतून…
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहातील मुली आणि महिला यांचे कपडे काढून पोलिसांनी त्यांना नग्न नाचण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेच्या चौकशीसाठी ६ वरिष्ठ महिला अधिकार्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने एकूण ४१ जणांच्या साक्षी घेतल्या, तेव्हा अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे तथ्य समितीने दिलेल्या अहवालातून समोर आले. या वसतीगहातील अपप्रकार झाल्याची तक्रार करणारी रत्नमाला सोनार ही महिला वेडसर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख पुढे म्हणाले की, आशादीप वसतीगृह हे महिलांचे असून तेथे एकूण १७ महिला रहातात. तक्रारदार महिलेच्या पतीने ती वेडसर असल्याची तक्रार यापूर्वी अनेकदा दिली होती, तसेच २० फेब्रुवारी या दिवशी वसतीगृहात मनोरंजनासाठी गरबा, कविता वाचन असा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. तक्रारदार महिलेने लांब झगा घातला होता. त्या झग्याचा त्रास झाल्याने तिने तो काढून ठेवला. या वसतीगृहाची नोंदवही पडताळली असता या वेळी कोणताही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी तेथे उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘व्हिडिओ काढला, नग्न व्हायला सांगितले’, या गोष्टीत आणि या घटनेच्या दिलेल्या वृत्तात तथ्य नाही.
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, हे वसतीगृह चांगल्या सोसायटीत आहे. घटना घडलेली नसतांना चुकीची माहिती दिल्याने संस्था आणि महिला यांची अपर्कीती होते. महिलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन चुकीचा होतो. त्यामुळे चुकीची माहिती देणार्यावर कारवाई करायला हवी. सदस्य नाना पटोले म्हणाले की, या घटनेचे वृत्त खोटे होते, हे लक्षात येते. या वृत्तामुळे राज्याची अपर्कीती झाली आहे. त्यामुळे वृत्त देणार्या दैनिक लोकमतवर कारवाई करणार का ?
चुकीचे वृत्त देणार्या ‘दैनिक लोकमत’च्या पत्रकाराची चौकशी करू !
गृहमंत्री देशमुख यांनी ‘चुकीचे वृत्त देणार्या ‘दैनिक लोकमत’च्या पत्रकाराची चौकशी केली जाईल’, असे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भावनेच्या आहारी जाऊन, तसेच घटनेची पार्श्वभूमी न पहाता असे वृत्त दिल्याने वातावरण गढूळ होते. केवळ टी.आर्.पी. मिळवण्यासाठी आणि ‘ब्रेकिंग न्यूज’साठी असे वृत्त देण्याऐवजी पत्रकारांनी त्याची शहानिशा करावी. अधिवेशनाच्या काळात अशा प्रक्षोभक बातम्या दिल्याने जळगाव आणि वसतीगृह यांची अपकीर्ती झाली आहे.