महाशिवरात्रीनिमित्त लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि श्री रत्नेश्वर देवस्थान यांची यात्रा रहित
लातूर – महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि श्री रत्नेश्वर देवस्थान यांची यात्रा कोरोनामुळे यंदा रहित करण्यात आली आहे. १ मार्च या दिवशी देवस्थानचे प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त यु.एस्. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, विश्वस्त अशोक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विधीवत् पूजा करण्यात येणार असून महाशिवरात्रीच्या रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. प्रतिवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूक या वर्षी रहित करण्यात आली आहे. या काठ्यांचे गाभार्यातच प्रत्येकी २ मानकर्यांच्या हस्ते पूजन होणार आहे.