‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, या स्वभावदोषावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा गिरिधर पाटील यांनी चिंतन करून केलेले प्रयत्न !
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, हा स्वभावदोष दूर होण्यासाठी काय प्रयत्न केले ?’, या गृहपाठाविषयी कु. महानंदा गिरिधर पाटील यांची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.
‘स्वभावदोष निर्मूलनाच्या संदर्भात महानंदा पाटील हिचे लेख इतके परिपूर्ण असतात की, ती सर्वांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संग’ घेऊ शकेल. तिचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी तिला सिद्ध केल्याविषयी त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. अत्तर भरण्यासाठीच्या यंत्रासंदर्भात एका साधकाला प्रश्न विचारत असतांना दुसर्या साधकाच्या प्रतिक्रियेमुळे ‘पूर्वग्रहदूषितपणा आणि राग येणे’, हे अहंचे पैलू अनावर होणे अन् राग आल्यावर अबोला धरणे
‘एकदा सनातन-निर्मित चमेली अत्तर भरण्यासाठी यंत्रावरील भांड्यात ओतले होते. अत्तर भांड्याच्या खाली असलेल्या चकतीवरून बाहेर येत होते. तेव्हा ‘रिंग’ खराब झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्याविषयी मी सहसाधकाला विचारले, ‘‘काका, ‘रिंग दर लॉटला’ पालटायची असते कि खराब झाल्यावर पालटायची असते ?’’ (म्हणजे ५० किलो अत्तर भरून झाल्यावर कि काही दिवसांनी) यावर दुसरा सहसाधक दोन्ही हात वर करून अयोग्य पद्धतीने म्हणाला, ‘‘ही चुकाच चुका बघत असते.’’ तेव्हा मला त्याचा पुष्कळ राग आला. मी सहसाधकाला विचारत होते. मग दुसरा सहसाधक ‘मला असे रागाने का बोलला ?’, असा विचार माझ्या मनात आला. ‘माझ्याविषयी सहसाधकाच्या मनात किती नकारात्मकता आहे’, याची मला जाणीव झाली. येथे माझ्यातील ‘पूर्वग्रहदूषितपणा आणि राग येणे’, हे अहंचे पैलू अनावर झाल्याचे मला जाणवलेे; पण मी काहीही न बोलता गप्प राहिले. या प्रसंगावर सहसाधकाला मी काही बोलले असते, तर तो प्रसंग वाढला असता; म्हणून मी गप्प बसले. मला पुष्कळ राग आला की, मी गप्प बसते. (म्हणजेच राग आल्यावर अबोला धरते.)
२. ‘सहसाधकाने प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्याचे मन मोकळे केले’, असा सकारात्मक विचार करून अबोला धरण्याऐवजी सेवेसाठी आवश्यक तेवढे बोलून स्वभावदोषांत न अडकण्याचा विचार करणे आणि ‘मन पवित्र अन् निर्मळ असल्यास देव भेटणार’, असा विचार करून सकारात्मक रहाणे
‘सहसाधकाने असे अयोग्य पद्धतीने बोलून माझे मन दुखावले होते; पण ‘मी त्याचे मन दुखावणार नाही. त्यांच्याशी चांगलेच वागायचे’, असे मी ठरवले. ‘मी सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जाते. तेथे मला त्यांचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे मलाच विचारांची दिशा पालटायची आहे. मला साधनेच्या दिशेला जायचे आहे. समोरचा कितीही वेडावाकडा वागला आणि मीही तशीच वागून त्याचे मन दुखावले, तर माझ्याकडून चूक होईल आणि ती चूक माझ्या खात्यात जमा होईल. (चूक झाल्यावर पाप लागून ते आपल्या खात्यात जमा होते.) त्याने मला बोलून माझे मन दुखावले का ? तो तसे बोलला, तर बोलू दे. देवाला बोलला. त्याने त्याचे मन मोकळे केले. त्याने मनात धरून ठेवले नाही. त्याला त्याचे मन मोकळे करून चांगले वाटले ना !’, असे विचार करून मी त्याच्याशी अबोला न धरता बोलीन; कारण मला साधना करायची आहे. मला माझ्यातील स्वभावदोषांवर मात करायची आहे. माझे स्वभावदोष घालवायचे आहेत. मी नेहमीप्रमाणेच सेवेत असतांना आवश्यक तेवढे त्याच्याशी बोलीन. मला स्वभावदोषांवर मात करून पुढे जायचे आहे. मनात राग धरून ठेवण्यापेक्षा मी देवाला शरण जाऊन स्वतःच्या आणि इतरांच्या चुका बघून इतरांनाही साहाय्य करीन. स्वभावदोषांत अडकून रहाण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जायला पाहिजे. स्वतःचे मन निर्मळ ठेवले पाहिजे. ‘मन पवित्र आणि निर्मळ असेल, तर देव माझ्याकडे येणारच आहे’, असे सकारात्मक विचार करीन.
३. मनात येणार्या अयोग्य आणि नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करून नाम घ्यायला लागल्यावर सकारात्मक पालट झाल्याचे जाणवणे
माझ्यातील तीव्र अहंमुळे मला राग आला होता. याचा माझ्या मनाला पुष्कळ त्रास झाला. ‘जर मी अहंचा त्याग केला, तर मला किती आनंद होईल’, असा मी विचार केला. मनातून नाम घ्यायला आरंभ केला. मी माझ्या मनात येणार्या अयोग्य आणि नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष केले. नाम घ्यायला लागल्यावर माझा श्वास मोकळा झाला. तेव्हा ‘माझे शरीर आणि मन यांवर आधी नकारात्मक परिणाम झाला होता. मी नाम घ्यायला लागल्यावर त्यांच्यात सकारात्मक पालट झाला’, असे माझ्या लक्षात आले. ‘आपण आपल्या स्वभावदोषांवर मात केली, तर आपल्याला आनंद मिळतो’, असे जाणवून मला पुष्कळ चांगले वाटले.
४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यामुळे मला साधनेत दिशा मिळत असून प्रयत्न करण्यास जमू लागले आहे. मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. महानंदा पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.४.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |