धन्य धन्य ते पावन क्षेत्र ‘राममंदिर बांदा’ ।
‘माघ शुक्ल पक्ष प्रतिपदा (१२.२.२०२१) या दिवशी प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे माझ्यासारख्या पामराला या आपत्काळातही बांदा येथील दिव्य राममंदिर आणि तेथील २ संत (प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) माई) यांच्या दर्शनाची संधी लाभली. राममंदिरात दर्शन घेतल्यावर तेथील फलकांवरील मंदिराचा इतिहास वाचला. त्यानंतर प.पू. दास (रघुवीर) महाराज यांच्या जवळ बसलो असता त्यांनी मला ‘राममंदिराची स्थापना आणि जीर्णोद्धार’ याचा बहुमोल इतिहास सांगितला. प.पू. दास महाराज यांच्या दिव्य शरिराकडे पाहिल्यावर त्यांच्या संकल्पशक्तीमुळे मला पुढील काव्यपंक्ती उत्स्फूर्तपणे स्फुरल्या. त्या काव्यपंक्ती ईश्वरानेच माझ्याकडून लिहून घेतल्या. त्या काव्यपंक्तींचे पुष्प प.पू. गुरुदेव आणि प.पू. दास महाराज यांच्या चरणी अर्पण करतो.
॥ श्रीराम ॥
अतीपावन भूमी बांदा, जिथे भेटती संत-महंत ।
दर्शनमात्रे जिवाला ना राहे भीती, दुःख अन् खंत ॥ धृ. ॥
इथे रहातात साक्षात् राम, लक्ष्मण अन् सीता ।
म्हणूनी इथे प्रत्येकाला भेटतात खरे माता-पिता ॥ १ ॥
अगाध कृपा करी इथे अन्नपूर्णा अन् हनुमंत ।
म्हणून जिवाच्या दुःखांचा होई तात्काळ अंत ॥ २ ॥
शितीमणी येथे मंदिर बांधकामाची जमविली भट्टी ।
पण मूर्तीस्थापना झाली नाही, आडवे आले अलमट्टी ॥ ३ ॥
राममंदिर बांदा हे स्थान गुह्य अन् गुप्त ।
मंदिर इथेच व्हावे, श्रीधरस्वामींची इच्छा सुप्त ॥ ४ ॥
म्हणूनी त्यांनी हे स्थान भगवानदास महाराजांना दर्शवले ।
पण मंदिराच्या पूर्तीसाठी भगवानदास महाराजांनी देह ठेवते झाले ॥ ५ ॥
संकल्प, समाज अन् माता यांच्या साहाय्याने रघुविरांनी मंदिर उभारले ।
मात्र त्यानंतर रघुविरांचे अनमोल मातृछत्र हरपले ॥ ६ ॥
प्रचंड आल्या अडचणी अन् खूप सोसला त्रास ।
पण दिव्य संतांनी नाही सोडिला मंदिराचा ध्यास ॥ ७ ॥
भगवानदास महाराज स्थापित ‘गौतमारण्य’ म्हणजे ‘रामनाथी’ ।
केवळ स्मरण करिता, जिवाला मिळे, अनंत पुण्य माथी ॥ ८ ॥
वचन दिले अर्धशतकापूर्वी श्रीधरस्वामींनी रघुविरा ।
होईल जीर्णोद्धार मंदिराचा, माझ्या दुसर्या अवतारा ॥ ९ ॥
मग भेटले रघुविरांना, विष्णुस्वरूपी परम पूज्य डॉ. जयंत आठवले ।
सच्चिदानंदस्वरूपी, परब्रह्मस्वरूपी दिव्य रूप दाविले ॥ १० ॥
परम पूज्यांनी केली वचनपूर्ती, जीर्णोद्धार झाला वर्ष २०१५ ।
मंदिराने मिळे सायुज्य मुक्ती, म्हणे रामाची कास धरा ॥ ११ ॥
आशीर्वाद देतात भगवानदास पिता अन् रुक्मिणी माता ।
रघुवीर चालवितात पुढे वारसा, त्यांचे ते माता-पिता ॥ १२ ॥
शेगावीचे योगी गजानन इथे साक्षात् अवतरले ।
अहो, या भूमीच्या कृपेने किती जीव तरले ॥ १३ ॥
इथे कृपा करतात अनेक संत, प.पू. भक्तराज महाराज ।
म्हणून इथे अवतरले सत्ययुगातील रामराज्य ॥ १४ ॥
बांदा क्षेत्र भव्य अन् राममंदिर असे दिव्य ।
कणाकणांत येथे भरले हो पवित्र पंचगव्य ॥ १५ ॥
अहो, इथे करून पहा सत्सेवा ।
मग पिढ्यान्पिढ्या खाल त्याचा मेवा ॥ १६ ॥
जरा कपाळी लावून पहा येथील माती ।
सत्वर पळून जाईल, तुमची साडेसाती ॥ १७ ॥
धरतीवरील भूवैकुंठ म्हणजे राममंदिर-बांदा ।
जावे तेथे एकदा तरी, सोडूनी कामधंदा ॥ १८ ॥
धन्य धन्य ते पावन क्षेत्र ‘राममंदिर बांदा’ ।
पुण्याई म्हणे जिवाला, आता इथेच नांदा ॥ १९ ॥
कलियुग हे घोर अन् पुढे उभा हा आपत्काळ ।
हृदयी धरा राम, करण्या सुसह्य भीषण काळ ॥ २० ॥
॥ श्री सीतारामचरणार्पणमस्तु ॥
– एक हितचिंतक