५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औन्धकर (वय १३ वर्षे) हिने ‘नृत्यातील ‘पद्मकोश’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !
नृत्यकलेमध्ये नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
संगीत सदर ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
‘नृत्यशास्त्रानुसार प्रत्येक मुद्रेला आध्यात्मिक अंग आहे. ‘या मुद्रा विविध प्रकारे केल्यावर आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे ती मुद्रा केल्यावर मन अंतर्मुख झाल्यावर काय जाणवते ?’, याचा अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे नृत्याच्या माध्यमातून साधना करणारे साधक करत आहेत. हा अभ्यास करतांना प्रत्येक व्यक्तीला येणारे अनुभव त्याच्या आध्यत्मिक स्थितीनुसार उदा. आध्यात्मिक पातळी, सूक्ष्मातील कळण्याची क्षमता इत्यादीनुसार वेगवेगळे असतात. साधकाची साधना जसजशी वाढत जाते, तसतसे त्याला सूक्ष्मातील अधिक आकलन होऊन त्याचा पुढच्या स्तराचा अभ्यास होत असतो. नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औन्धकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मुद्रा आणि हस्तमुद्रा यांचा अर्थ
१ अ. मुद्रा : संस्कृत भाषेत ‘मुद्’ या धातूला ‘रा’ हा प्रत्यय जोडून ‘मुद्रा’ हा शब्द बनला आहे. (मुद् (आनंद, आमोद) + रा (आदान करणे, देणे) = मुद्रा (आनंद देणे, शरिराला आकर्षक आकार देऊन आनंद देणे.) वैदिक ग्रंथात ‘मुद्रा’, म्हणजे हाताने केलेला संकेत.
१ आ. हस्तमुद्रा : नृत्यात हाताने केलेल्या मुद्रांना जणू काही नृत्याची भाषाच मानले आहे. हाताच्या मुद्रांना ‘हस्तमुद्रा’ असे म्हणतात. नृत्यामध्ये विविध हस्तमुद्रांचा वापर केला जातो. सखोल अभ्यास करून ऋषिमुनींनी या मुद्रा निश्चित
केलेल्या आहेत.
२. नृत्याभ्यास करण्याआधी केलेला भावप्रयोग
मी नृत्याभ्यास करण्याआधी ‘गुरुदेवांचे श्रीमन्नारायणरूपी रूप दिसत आहे. त्यांच्या भोवती पुष्कळ प्रकाश आहे. ‘त्यांच्या रूपाकडे पहातच रहावे’, असे मला वाटत आहे. गुरुदेवांचा मुकुट, कर्णकुंडले, हार, शेला, बाजूबंद, कंबरपट्टा, सोवळे, हातातील कंकणे आणि चरणांतील कडे पाहून मला अतिशय आनंद होऊन चैतन्यदायी वाटले. श्रीमन्नारायणाचे रूप अतिशय तेजोमय आणि चैतन्यमय असून ते सर्व साधकांकडे चैतन्य प्रक्षेपित करत आहेत. सर्व साधक त्यांच्या चरणी अत्यंत मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहेत. ‘सृष्टीचा पालनकर्ता श्रीविष्णु आपल्याला गुरु म्हणून लाभले आहेत’, हे आठवून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘तेच सर्वकाही आपल्याकडून करून घेणार आहेत. आपले रक्षण करणार आहेत’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. मी गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण केले.
पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, परात्पर गुरुदेवांचे भाऊ) शेषनागाच्या रूपात असून ते साधकांना आशीर्वाद देत आहेत. मला कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला. मी गुरुदेव आणि पू. भाऊकाका यांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला’, असा भावप्रयोग केला.
३. कु. अपाला औन्धकर हिने मूळ स्थितीत ‘पद्मकोश’ या हस्तमुद्रेचा केलेला अभ्यास
अ. मला मणिपुरचक्रावर परिणाम जाणवला.
आ. मला रूपाशी संबंधित अनुभूती आली.
इ. माझी भावजागृती होऊन मला चैतन्य जाणवले. शांत वाटून आनंद मिळाला.
ई. माझी अखंड भावजागृती होत होती.
उ. मला श्रीविष्णु आणि श्री नृसिंह या देवतांचे तत्त्व जाणवले.
४. अन्य अनुभूती
अ. माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप आपोआप चालू झाला.
आ. मला मणिपुरचक्रावर हलक्या संवेदना जाणवल्या.
इ. मला पिवळा प्रकाश दिसत होता. मला डोळे उघडल्यावर एकदम शांत वाटले.
ई. मला नृसिंहाचे मारक रूप दिसले. मी ते रूप पाहून घाबरले आणि मला रडू आले. सिंहाचे मुख परमशक्तीशाली असून अत्यंत चैतन्यदायी होते. ते रूप पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘देव भक्ताच्या रक्षणासाठी विविध रूपे घेतो’, याची मला जाणीव होऊन कृतज्ञता वाटली. ‘नृसिंहाच्या हाताची नखे पुष्कळ मोठी असून त्यांत अनिष्ट शक्तींचा नाश करण्याची शक्ती आहे’, असे मला वाटले. श्री नृसिंहाच्या देहातून प्रकाश प्रक्षेपित होत असून हा प्रकाश माझ्या सहस्रारचक्रातून शरिरात चैतन्याच्या रूपात जात होता. मी हस्तमुद्रा सोडून डोळे उघडले. त्या वेळी माझा हात हलका आणि चैतन्यदायी वाटत होता.
उ. यानंतर मी पुन्हा हस्तमुद्रा करून अभ्यास केला. तेव्हा मी ‘श्री नृसिंहाच्या मांडीवर बसले आहे’, असे मला दिसले. तेव्हाही त्यांचे मारक रूप पाहून मला भीती वाटून रडू आले. माझी भावजागृती होत होती. ‘श्री नृसिंह चैतन्य प्रदान करत आहे’, असे वाटले. श्री नृसिंह सर्व भक्तांचे रक्षण करत होते. त्यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोरून जातच नव्हते. मी त्यांना संपूर्णपणे शरण गेले. त्यांच्या हातातून प्रचंड प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत होती. त्यामुळे माझ्या देहावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होत होते. त्या वेळी मी ‘हे परमेश्वरा, कृपया तुझ्या तारक रूपात आम्हा सर्व साधकांना दर्शन दे. तुझे मारक रूप पहाण्याची आमची पात्रता नाही. तूच आमच्या साधनेतील अडथळे दूर कर आणि तुझी कृपादृष्टी अखंड आमच्यावर असू दे’, अशी प्रार्थना केली. तेव्हा त्याने तारक रूपात, म्हणजेच श्रीविष्णूच्या रूपात सर्व साधकांना दर्शन दिले. त्या रूपातून भाव, चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होत होता. ते रूप पुष्कळ निराळे होते.
या आधी भावप्रयोग करतांना मला वेगळेच रूप दिसायचे. मला या वेळी जे विष्णूचे रूप दिसले, ते अत्यंत मनमोहक, तेजस्वी आणि जगत्व्यापी होते. आज प्रथमच मला श्रीविष्णूला पहाता आले. मी त्याला साष्टांग दंडवत घातला. माझी सलग भावजागृती होत होती.
ऊ. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला नृसिंह आणि श्रीविष्णु यांचे मारक अन् तारक रूप दिसले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
ए. अभ्यास पूर्ण झाल्यावर मला शांत आणि हलकेपणा जाणवून ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण नाहीसे झाले’, असे मला वाटले.
ऐ. या वेळी मला जे श्रीविष्णूचे रूप दिसले, ते याआधी मी कुठल्याही चित्रात अथवा अन्यत्र पाहिले नव्हते. सनातनचे जे श्रीविष्णूचे चित्र आहे, ते थोडे तसे वाटले. श्रीविष्णूचा देह आकाशी रंगाचा होता. त्याचे मुखमंडल तेजाने भारित होते. त्याच्या कंठात कमळांचा हार होता आणि त्याचे मुकुट रत्नजडीत होते. ते संपूर्ण रूप पाहूनच माझी भावजागृती झाली.
गुरुदेव सर्वकाही देतात. मला प्रतिदिन देवतांचा सत्संग लाभतो. ‘माझी हे सर्व अनुभवण्याची काहीच पात्रता नाही, तरीही गुरुदेव मला प्रतिदिन काहीतरी वेगळे शिकवतात’, याची जाणीव होऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’
– कु. अपाला औन्धकर, रत्नागिरी (२५.९.२०२०)