साधकांनो, आध्यात्मिक पातळीमध्ये अडकण्यापेक्षा हनुमानाप्रमाणे भक्ती करून गुरुचरणांशी स्थान मागूया !
माघ कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजेच उद्या ५ मार्च २०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी साधकांना दिलेला संदेश येथे देत आहोत.
‘सनातनचे अनेक साधक घरदार, आईवडील, नातेवाईक, तसेच तन-मन-धन यांसह सर्वस्वाचा त्याग करून आश्रमात आले आहेत. ते गुरुसेवा करण्यासाठी, स्वतःचा उद्धार करवून घेण्यासाठी, प्रारब्ध न्यून होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्यासाठी आश्रमात राहून साधना करत आहेत. अलीकडे अनेक साधकांच्या बोलण्यातून असे जाणवते की, त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली नाही किंवा वाढायला हवी.
१. अनेक वर्षे साधना करणार्या साधकांना आध्यात्मिक पातळीची अपेक्षा नसणे आणि त्यातील काही साधक संत किंवा सद्गुरु होणे
साधकांनी लक्षात घ्यायला हवे, ‘आपण आश्रमात स्वतःच्या उद्धारासाठी आलो आहोत. हा उद्धार केवळ मनुष्यजन्मातच होतो. ८४ लक्ष योनी असून त्यातील केवळ मनुष्यजन्मातच उद्धार होतो.’ मला स्वतःला सनातन संस्थेत येऊन १८ वर्षे झाली. या कालावधीत मला असे दिसले की, जे अनेक वर्षांपासून साधनेत आहेत, त्यांच्यात भाववृद्धी होऊन ते संत अथवा सद्गुरु झाले. त्यांच्या बोलण्यात ‘आध्यात्मिक पातळी’ हा शब्द कधी आला नाही. आज अनेक वर्षांपासून साधना करत असलेले अनेक साधक आहेत की, ज्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली नाही; पण त्या साधकांना त्यांची आध्यात्मिक पातळी वाढण्याची अपेक्षा नाही.
२. प्रभु श्रीराम आणि त्याचा महान भक्त हनुमान
२ अ. प्रभु श्रीरामाच्या कार्यात मोठ्या प्रमाणात योगदान देऊनही त्याच्या चरणांशी स्थान मागणारा रामभक्त हनुमान ! : ‘प्रभु श्रीराम वनवासात असतांना सीतामातेचा शोध लावणे, सेतू बांधणे आदी विविध प्रकारच्या सेवा हनुमानाने केल्या’, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. प्रभु श्रीरामाने कार्य पूर्ण झाल्यावर वानरसेनेने जे साहाय्य केले, त्या सर्वांना संभावना (भेटवस्तू) दिली. त्याप्रमाणे रामरायाने हनुमानालाही संभावना घेण्यासाठी बोलावले. त्या वेळी हनुमानाने रामरायाला ‘प्रभो, मला संभावना नको’, असे सांगितले. त्यावर प्रभु श्रीराम म्हणाला, ‘‘माझ्याकडे तुला संभावना देण्यासारखे काही नाही. त्यामुळे ‘संभावना नाही, हीच संभावना !’ तुझ्या कार्याचे मोल मला करताच येणार नाही.’’ त्यावर हनुमान म्हणाला, ‘‘प्रभो, ज्याने त्रैलोक्य निर्माण केले, ते तुम्ही ‘संभावना’ नाही म्हणता ? जे तुमच्याकडे आहे, ते कुणाकडेही नाही. मी तुम्हाला मागतो, ती संभावना मला द्याल का ?’’ त्यावर प्रभु श्रीराम म्हणाला, ‘‘हो दिली, माग.’’ तेव्हा हनुमान म्हणाला, ‘‘प्रभु, ज्या तुळशीपत्राने तुमच्या चरणांची पूजा होते, त्या चरणांशी मला बसायला स्थान द्या !’’ हनुमानाने मोठे कार्य करूनही प्रभु श्रीरामाच्या चरणांशी स्थान मागितले.
२ आ. तोच प्रभु श्रीराम आज कलियुगात श्रीरामस्वरूपात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहे. आज साधक वानरसेनेच्या रूपात, तर सर्व साधिका गोपीरूपात आहेत.
३. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आध्यात्मिक पातळीचा विचार न करता सहभागी व्हा !
आपण स्वतःच्या उद्धारासाठी त्याग केला आहे. त्यामुळे आध्यात्मिक पातळीचा विचार करायला नको, तर हनुमानाप्रमाणे गुरुचरणांशी स्थान मागायला हवे. ‘ज्याप्रमाणे त्रेतायुगात प्रभु श्रीरामांनी वानरांच्या साहाय्याने विजयपताका लावली, त्याप्रमाणे गुरुदेवांना हिंदु राष्ट्र आणायचे आहे.
४. आपत्काळात प्रभु श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर साधकांचे रक्षण करणारच आहेत !
आपत्काळ जवळ येऊन ठेपला असून त्यातून प्रभु श्रीराम तारणार आहे. त्यामुळे मनातील आध्यात्मिक पातळीचा विचार दूर करूया आणि प्रभु श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ याही साधकांना आध्यात्मिक पातळीची इच्छा न ठेवता पुढे जाण्यास सांगत आहेत. साधकांनो, स्वतःचा उद्धार करून घेऊन प्रभु श्रीरामस्वरूप असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी स्थान मागूया. आज अनेक संत आणि सद्गुरु आध्यात्मिक पातळीत न अडकल्याने गुुरुपदाला पोचले. ‘आपण सर्वांनीही तसा प्रयत्न करून उद्धार करून घ्यावा’, असे आम्हा उभयतांना वाटते.’
– आपला चरणसेवक,
प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२०)