धार्मिक तेढ निर्माण करणारा हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याला अटक केल्याविना रहाणार नाही ! – मुख्यमंत्री

शरजील उस्मानीसारख्या पिलावळींचा श्रीराम मंदिराला मोठा धोका !

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदूंचा अवमान आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा अलिगड मुस्लीम विद्यापिठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याला अटक केल्याविना आम्ही रहाणार नाही. हा शरजील उस्मानी उत्तरप्रदेशमधील घाण आहे. ती तिथेच संपवता आली असती. शरजीलसारख्या देशद्रोह्यांची पिलावळ जर उत्तरप्रदेशात असेल, तर अशा पिलावळींचा श्रीराम मंदिराला मोठा धोका आहे. या पिलावळींमुळे मंदिराचा पाया भक्कम राहू शकणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत ३ मार्च या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतांना केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी करणारे पत्र आम्ही २ वेळा केंद्र सरकारला पाठवले होते; मात्र केंद्र सरकारने अद्यापही त्या पत्रांची नोंद घेतली नाही. त्यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ का दिला जात नाही ?

२. श्रीराम मंदिर बांधण्यासाठी आता घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली जाते. हे मंदिर बांधल्यानंतर तिथे तुमची नावे लागली पाहिजेत, यासाठी हा सर्व खटाटोप आहे का ?

३. बाबरी मशीद पाडली तेव्हा, ‘येडे गबाळे’ पळून गेले; मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उभे राहून ‘शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल, तर त्याचा मला अभिमान आहे’, असे अभिमानाने सांगितले होते. काश्मीरमध्ये पीडीपीसमवेत मांडीला मांडी लावून सत्ता भोगली, त्या वेळी विरोधकांचे हिंदुत्व कुठे गेले होते ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

४. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’, असे नामकरण आम्ही जरूर करू.

५. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ज्या आपल्याकडून चुका झाल्या, त्याची पुनरावृत्ती करायला नको, ही लाट थोपवण्याचा प्रयत्न करूया.

६. पंजाबमधील शेतकरी आंदोलन करत असतांना त्यांची वीज आणि पाणी जोडणी तोडली जाते. सत्ता मिळाल्यानंतर शेतकर्‍यांना रस्त्यावर ताटकळत ठेवत रहायला हा देश तुमची खासगी मालमत्ता नाही.

७. विदर्भ माझे आजोळ आहे, ते माझ्यापासून तोडू नका. विदर्भ वेगळा होणार नाही.

८. महाविकास आघाडी सरकारने चालू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे गरिबांची पोटे भरली. महाविकास आघाडी सरकारने गरिबाला भरलेली थाळी दिली; केंद्र सरकारप्रमाणे रिकामी थाळी वाजवायला लावली नाही, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

९. कोणतेही आरोप करतांना महाराष्ट्राची अपर्कीती होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. प्रारंभीच्या काळात सुविधा अपुर्‍या असतांनाही उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. जिल्ह्यात सगळीकडे ‘कोविड सेंटर’ सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आली. प्रारंभी कोविड चाचणी करण्यासाठी राज्यात केवळ २ प्रयोगशाळा होत्या, आता ती संख्या ५०० च्या वर गेली आहे.

१०. कोविडच्या काळात राज्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यानंतर ‘मी जबाबदार’ अशीही मोहीम राबवली आहे.

११. देहली येथे अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत असतांना केंद्र सरकारकडून त्यांना सहकार्य दिले जात नाही. उलट त्यांची वीज कापण्यात येते, त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो, शौचालयाची व्यवस्था काढण्यात येते, शेतकर्‍यांची अशी गैरसोय केंद्र सरकारकडून केली जात आहे.

१२. महाराष्ट्र ‘मेट्रो कारशेड’चे सूत्र हे प्रतिष्ठेचे होऊ शकत नाही. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र बसून यामधून मार्ग काढणे आवश्यक आहे. सर्व ‘मेट्रो लाइन्स’च्या कारशेड एकच झाल्याने भविष्यात त्याचा मोठा लाभ राज्याला होणार आहे. त्यामुळे ‘मेट्रो कारशेड’ हे कांजूरमार्ग येथे व्हावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.