पारधी जक्कल काळे यांच्या गुंडगिरीमुळे प्रशासनाची धावपळ, तर ग्रामस्थ हैराण
एका गुन्हेगाराचा ग्रामस्थांना त्रास होत असूनही त्याच्या मुसक्या आवळता न येणे ही पोलिसांची निष्क्रीयता नव्हे का ?
सातारा, ३ मार्च (वार्ता.) – वाई तालुक्यातील सुरूर येथे पारधी समाजातील जक्कल रंगा काळे यांनी ४ जणांवर आक्रमण करत त्यांना घायाळ केले. त्यामुळे सुरूर आणि पंचक्रोशीतील युवकांचा जमाव बेघर वस्तीवर चाल करून गेला. अंधाराचा लाभ घेत काळे आणि त्यांचे कुटुंबीय पळून गेले; मात्र जातांना त्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष कालवण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांना धावपळ करावी लागली. काळे यांच्या त्रासामुळे सुरूर ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
घडलेल्या प्रकारामुळे भुईंज पोलिसांनी तात्काळ बेघर वस्तीमध्ये ‘कोंम्बिंग ऑपरेशन’ करत काळे यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला; परंतु काळे आणि त्यांचे कुटुंबीय पळून गेले. काळे यांनी दिलेल्या धमकीमुळे पोलिसांनी गावाचा पाणीपुरवठा बंद करून सातारा येथील प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी पाठवले. ग्रामपंचायतीने सर्व पाणी सोडून देऊन जलकुंभाचे निर्जंतुकीकरण केले. त्यामुळे संपूर्ण गावाला पाण्यापासून वंचित रहावे लागले. सध्या सर्वत्र ज्वारी काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे विनामूल्य ज्वारी मिळण्यासाठीही काळे हा गावात दहशत माजवत असल्याचे समजते. या प्रकरणी काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस काळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा कसून तपास करत आहेत.
‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या कह्यात
सुरूर येथील बेघर वस्तीमध्ये वाई येथील २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक आणि २५ अंमलदार एवढा मोठा फौजफाटा घेऊन ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या वेळी २ कोयते, ४ कुर्हाडी, २ लोखंडी गज, १ भाला, १ हॉकी स्टीक, १ लोखंडी पहार, १ पक्कड, १ खुरपे, १ विळा, १ चाकू, १ गिरमीट, १ हातोडा, १ बर्चा, २ सुरे आणि ५ चाकू अशी शस्त्रे आढळून आली. या वेळी चंदन चोरीमध्ये पोलिसांना हवी असलेली ताराबाई काळे आणि अभिता भोसले हे दोन संशयित पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले आहे. (मोठा फौजफाटा घेऊनही गुन्हेगार पकडला जात नसेल, तर पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये त्रुटी आहे का, हे शोधावे लागेल. एका गावातील गुन्हेगाराचा बंदोबस्त करू न शकणारे पोलीस प्रशिक्षित आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ? – संपादक)