२ दिवसांत दोषींवर कारवाई करणार ! – गृहमंत्री अनिल देशमुख
-
जळगाव येथील आशादीप महिला वसतीगृहात तरुणींवर पोलिसांनी अत्याचार केल्याच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद !
-
…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल ! – सुधीर मुनगंटीवार,नेते, भाजप
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – जळगाव येथील ‘आशादीप महिला शासकीय वसतीगृहा’त महिला आणि मुली यांना विवस्त्र करून नाच करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकरणाचे पडसाद ३ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले. याविषयी भाजपच्या आमदार सौ. श्वेता महाले म्हणाल्या की, महिला आणि तरुणी यांना विवस्त्र करून नाच करायला लावून त्याचा व्हिडिओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराविषयी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ‘या प्रकरणातील दोषी पोलिसांना निलंबित करावे’, अशी मागणी त्यांनी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी ४ उच्चस्तरीय अधिकार्यांची समिती गठीत करून येत्या २ दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानुसार जे दोषी असतील, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करू’, असे आश्वासन दिले.
…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप
वरील घटनेविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘या प्रकरणाची नोंद घेतली आहे’, असे म्हटले. यावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, जळगाव येथील प्रकरण महत्त्वाचे असतांना गृहमंत्री नुसते ‘नोंद घेतो’, असे कसे म्हणतात ? राज्यात माझी किंवा गृहमंत्री यांच्या आई-बहिणीविषयी कुणी असे आक्षेपार्ह कृत्य केले, तर गृहमंत्री किंवा मी गप्प बसलो असतो का ? राज्यातील आई-बहिणींची अशी थट्टा करणार्यांवर कारवाई होत नसेल, तर राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू केली जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.
१. आमदार मुनगंटीवार यांच्या चेतावणीला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, मुनगंटीवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी धमक्या देत असून हे योग्य नाही. त्यांनी म्हटलेले ते वाक्य कामकाजातून काढावे.
२. या प्रकरणाविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या लोकशाहीत सरकार विसर्जित करण्याविषयी कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे. जळगाव येथील प्रकरणात ‘व्हिडिओ क्लिप्स’ मिळाल्या आहेत. महिला आणि मुली यांना नग्न करून पोलीस नाचवतात, हे गंभीर आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलतेने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी.
या प्रकरणी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकारांना सांगितले, ‘‘या घटनेच्या संदर्भात माझ्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार आपण चौकशी समिती गठीत केली असून ती संपूर्ण घटनेचे अन्वेषण करून अहवाल देणार आहे. या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.’’
काय आहे प्रकरण ?
जळगाव येथील ‘आशादीप महिला शासकीय वसतीगृह’ ही संस्था विधवा, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या, तसेच कुमारी माता, मुली, अनाथ मुले यांना आधार देते. या वसतीगृहातील महिला आणि मुली यांना पोलीस कर्मचारी, तसेच बाहेरच्या काही जणांनी नग्न नाच करायला लावला. जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी आणि इंदुबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्षा मंगल सोनवणे यांनी २ मार्च या दिवशी वसतीगृहात जाऊन महिला अन् तरुणी यांची भेट घेतल्यावर वरील प्रकार समोर आला.
या महिलांनी स्वतःवर अन्याय आणि अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये ‘काही कर्मचारी संगनमताने बाहेरील लोक आणि पोलीस कर्मचारी यांना चौकशीच्या नावाखाली वसतीगृहात प्रवेश देऊन अनैतिक कृत्य करतात’, असे महिला आणि तरुणी यांनी सांगितले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांना वसतीगृहात प्रवेश देण्यास नकार देण्यात आला होता; मात्र तरुणींनी स्वत:वर बेतलेले प्रसंग वसतीगृहातील खिडकीतूनच ओरडून सांगितले. या प्रकरणी फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्यांनी कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी दिली.