उल्हासनगर येथे पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणार्या २ भावांना न्यायालयीन कोठडी
ठाणे, ३ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील विविध शहरांत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्य चौकांसह अन्य ठिकाणी स्थानिक महानगरपालिकेचे पथक आणि पोलीस विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. अशाच कारवाईच्या काळात उल्हासनगरमधील श्रीराम चौकात विनामास्क जाणार्या एका तरुणाला पोलिसांनी हटकले. यामुळे त्याने संतप्त होऊन पोलिसांना खडसवण्यासाठी भावाला समवेत आणले. दोन्ही भावांनी पोलिसांना खडसावून भर रस्त्यातच शिवीगाळ केली. या प्रकरणाचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी आशिष आणि आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.