४ शासकीय अधिकार्यांसह २२ जण निलंबित केले ! – धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय
विधानसभा प्रश्नोत्तरे…
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेतील १६ कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेतील १६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी भाजपच्या आमदारांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात केली. या सूत्रावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील ४ शासकीय अधिकार्यांसह २२ जणांना निलंबित करण्यात येत आहे, असे सांगितले, तसेच या प्रकरणी एक समिती गठीत करून ‘एस्.आय.टी.’ नियुक्त करू, असेही त्यांनी घोषित केले. दोषी अधिकार्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूत्रावरून मुंडे आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा प्रश्न शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचे लेखापरीक्षण करून लेखापरीक्षकांनी जो अहवाल दिला, तो अहवाल सनदी लेखापालांनी मान्य केला का ? त्याला उत्तर देतांना मुंडे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १६ कोटींपैकी ३ कोटी ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले. विविध कार्यक्रमांसाठी विनाअनुमती संस्थेला ९० लाख रुपये देण्यात आले आहेत. त्या व्ययाचा ताळमेळ लागत नाही, तसेच या संस्थेच्या लेखापरीक्षणाचा अहवाल प्रकल्प अधिकार्यांनी ‘कॅग’ला पाठवला नाही. त्यामुळे ‘कॅग’ने या प्रकरणाविषयी कोणताही ठपका ठेवला नव्हता.
सुधीर मुनगंटीवार या वेळी आक्रमक भूमिका घेऊन ‘अधिकार्यांनी गैरव्यवहार झाल्याची माहिती लपवणे आणि ती ‘कॅग’ला न देणे हा गुन्हा असल्याने संबंधित अधिकार्यांची नावे ५ वाजेपर्यंत सभागृहात देऊन त्यांना निलंबित करणार का ?’, असा प्रश्न केला. त्यामुळे मुंडे यांनी वरील निर्णय घोषित केला.