कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना व्यष्टी आणि समष्टी स्तरावर झालेेले लाभ !

पू. अशोक पात्रीकर

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २२.३.२०२० या दिवसापासून संपूर्ण देशात अकस्मात् दळणवळण बंदी लागू करण्यात आली. देश-विदेशांतील सर्व व्यवहार थांबवण्यात आले. प्रवास करणे, नोकरी आणि व्यवसाय करणे, हे सर्व त्या दिवसापासून अकस्मात् बंद झाले. यापूर्वी असे कुणीही अनुभवले नसल्याने समाज सैरभैर झाला होता. सनातनच्या साधकांनाही ‘पुढे कसे होणार ? प्रसार कसा होणार ?’, याविषयी संभ्रम होता; पण आपत्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता गुरुमाऊलीने साधकांकडून आधीच करवून घेतली होती. ‘परिस्थिती आनंदाने स्वीकारून प्रसार कसा करावा’, याविषयी साधकांना गुरुमाऊलीच्या संकल्पाने नवीन कल्पना सुचल्या आणि लगेच त्या कृतीत आणण्याचे प्रयत्न आपोआप होऊ लागले. या दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना झालेले लाभ या लेखात आपण पाहूया.

१. साधकांना व्यष्टी साधनेच्या दृष्टीने झालेले लाभ

अ. एरव्ही ‘घराबाहेर जाऊन सेवा कराव्या लागतात. रात्री थकायला होते. त्यामुळे व्यष्टी साधनेला वेळ मिळत नाही’, अशा कारणांमुळे साधकांचे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होत असे. दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांचे घराबाहेर जाणे बंद झाल्याने त्यांच्या व्यष्टी साधनेचे आढावे प्रतिदिन घेणे चालू केले. दळणवळण बंदीपूर्वी हे आढावे आठवड्यातून एकदाच होत होते; पण ‘प्रतिदिन आढावा आहे’, असे निश्‍चित झाल्यावर आपोआपच साधकांच्या प्रयत्नांत वाढ झाली. आजतागायत हे आढावे प्रतिदिन चालू आहेत. यापूर्वी ज्यांचे प्रयत्न होतच नव्हते, अशा साधकांचेही प्रयत्न होऊ लागले.

आ. साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढल्यामुळे त्यांच्या स्वभावात चांगले आणि सकारात्मक पालट होऊ लागले. त्यामुळे साधकांच्या आनंदात वाढ होऊ लागली. त्यांना व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची गोडी लागली.

इ. साधकांचे सेवेतील व्यस्ततेमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन होत नव्हते. आता साधक दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे वाचू लागले.

ई. साधक सेवांच्या व्यस्ततेमुळे त्यांच्या नातेवाइकांना संपर्क करत नव्हते. नातेवाइकांसाठी सत्संग चालू करण्याचे नियोजन झाल्यावर साधकांनी नातेवाइकांना संपर्क केले आणि त्यांनाही साधना करायला सांगितली. त्यामुळे साधकांमध्ये नातेवाइंकांप्रती प्रेमभाव निर्माण व्हायला साहाय्य झाले.

उ. घराबाहेर जाणे शक्य नसल्याने साधकांची कपडे किंवा खाणे-पिणे यांविषयीची आवड-निवड न्यून झाली.

ऊ. दळणवळण बंदीच्या कालावधीत प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी अनेक संतांनी साधकांना विविध नामजपादी उपाय करायला सांगितले. त्यामुळे साधकांची संत आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती श्रद्धा वाढली.

२. साधकांच्या युवा मुला-मुलींना झालेले लाभ

अ. साधकांच्या बर्‍याच तरुण मुला-मुलींना साधनेची आवड नव्हती. या काळात घरी रहाणे अनिवार्य झाल्याने त्यांची साधनेतील गोडी वाढली. त्यामुळे त्यांना अनुभूती आल्या. त्यानंतर त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिबिर घेण्यात आले. त्यातील काही जणांनी साधना आरंभ केली, एवढेच नव्हे, तर काही युवकांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.

आ. या काळात प्रसाराचे एकमेव माध्यम ‘ऑनलाईन’ असल्याने आणि युवकांना सोशल मिडियाची सेवा आवडत असल्याने काही जणांनी ही सेवा आनंदाने स्वीकारली.

इ. युवा साधकांनी साधनेचा विषय त्यांच्या मित्र-मैत्रिणींना सांगितला आणि त्यांच्यापैकी काही जणांना साधनेत गोडी निर्माण होऊन ते साधना करू लागले.

३. बालसाधकांमध्ये झालेला पालट

अ. साधकांचे नियमित होत असलेले व्यष्टी साधनेचे आढावे ऐकून त्यांची दैवी बालकेही साधनेविषयी आढावा देऊ लागली. काही मोठ्या बालसाधकांनी सारणी लिखाण चालू केले आणि आढाव्यात चुका, तसेच प्रायश्‍चित्त सांगायला आरंभ केला.

आ. सनातनच्या वतीने प्रतिदिन सादर होत असलेल्या बालसंस्कार या मालिकेच्या प्रक्षेपणामुळे बालसाधकांना ते ऐकण्याची आणि पहाण्याची गोडी लागली.

४. साधक कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेले पालट

अ. कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी अनेक संतांनी सांगितलेले काही नामजपादी उपाय ऑडिओच्या माध्यमातून करायचे असल्याने कुटुंबातील साधना न करणार्‍या सदस्यांना ते शब्द आपोआप ऐकू येऊ लागले. ते मंत्र आणि नामजप यांच्या सामर्थ्याने कुटुंबियांमध्येही ते ऐकण्याची गोडी लागली. त्याचा योग्य तो परिणाम होऊ लागला आणि तेही नामजपादी उपाय करू लागले.

आ. साधकांच्या स्वभावात चांगला पालट झाल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी झाले.

इ. ‘या काळातही सनातन संस्था साधकांची एवढी काळजी घेत आहे’, हे प्रत्यक्ष अनुभवल्याने ज्या साधकांना घरून साधनेला विरोध होता, त्यांना होत असलेला विरोध मावळला. काही साधकांच्या कुटुंबातील सदस्य साधना करू लागले.

५. समष्टी साधनेच्या दृष्टीने झालेले लाभ

अ. ‘घरी राहून समष्टी साधना काय करावी ?’, हे आरंभी साधकांना कळत नव्हते. नंतर दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची छपाई थांबल्याने दैनिकाच्या पानांची संरचना करून त्यांची ‘पी.डी.एफ.’ प्रत सर्व वाचकांना प्रतिदिन पाठवण्याचे नियोजन केले. त्यामुळे साधक प्रतिदिन ती सेवा करू लागले.

आ. साधकांकडून धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ता, उद्योगपती, वाचक, विज्ञापनदाते यांना नियमितपणे करण्यात येत असलेले प्रत्यक्ष संपर्क बंद झाले होते. साधकांकडून त्यांना भ्रमणभाषवर संपर्क होत असत. त्यांच्याशी जवळीक होण्यासाठी आणि त्यांना साधनेची गोडी लागावी, म्हणून त्यांची ‘ऑनलाईन’ शिबिरे घेण्यात आली. दळणवळण बंदीमुळे घरी असलेल्या धर्मप्रेमींचा या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांच्यातील उत्साह पाहून साधकांचे त्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न वाढले.

इ. दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर काही दिवसांनी समाजातील लोकांसाठी दिवसातून चार प्रकारच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांचे आयोजन करण्यात आले. त्यांची निमंत्रणे देण्याच्या सेवा साधकांना उपलब्ध झाल्या.

ई. नंतर आलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजाकडून ‘ऑनलाईन’ अर्पण घेण्याचे नियोजन करण्यात आले. काही परिचितांना ‘दळणवळण बंदीमुळे आम्ही या वर्षी प्रत्यक्ष भेटीला येऊ शकत नाही’, असे सांगून अर्पण देण्याची विनंती केल्यावर अर्पणदात्यांनी आनंदाने अर्पण दिले.

उ. आता ग्रंथवितरणही ‘ऑनलाईन’ मागणी घेऊन करण्यात येत आहे.

६. आपत्कालीन स्थितीतही आनंदी असलेले साधक

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे आणि प्रतिदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्व विश्‍व चिंतित होते, तसेच आजही आहे. प.पू. डॉक्टरांनी साधकांना आपत्काळाची जाणीव आधीच करून दिल्याने साधकांना ‘असा काळ येणार’, हे ठाऊक होते. या कालावधीत विविध नामजपादी उपायांमुळे साधकांच्या भोवती अभेद्य असे संरक्षककवच निर्माण झाले असल्याचे अनुभवल्याने सनातनचे साधक या भीषण अशा आपत्काळातही गुरूंवर श्रद्धा ठेवून आनंदी होते.

७. आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रसार होत असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

साधकसंख्या अल्प असल्याने प्रत्यक्ष संपर्क करून अध्यात्मप्रसार आणि राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य वाढण्यासाठी मर्यादा होत्या. दळणवळण बंदीमुळे सर्व सेवा ‘ऑनलाईन’ होत असल्याने आणि साधक घरीच रहात असल्याने प्रसारकार्य अफाट गतीने वाढले. प.पू. डॉक्टर त्याविषयी म्हणाले, ‘‘इंटरनेट’ म्हणजे अवकाशातील सूक्ष्म लहरी आहेत. या लहरींच्या माध्यमातून होणारा हा प्रसार आकाशतत्त्वाच्या माध्यमातून होत आहे. आकाशतत्त्व हे सर्वांत सूक्ष्म तत्त्व असल्याने प्रसाराची गती वाढली आहे.’’

या भीषण काळात साधकांना फुलाप्रमाणे जपणार्‍या कृपाळू आणि दयाळू गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. अशा गुरुमाऊलींनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या पवित्र चरणांवर समर्पित करतो.

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (९.१२.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक