महिला न्यायाधिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्‍या अधिवक्त्याला अटक

विनाअनुमती फेसबूकवरून न्यायाधिशांचे छायाचित्र डाऊनलोड केल्याचा आरोप  

रतलाम (मध्यप्रदेश) – येथील अधिवक्ता विजयसिंह यादव यांनी न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) मिथाली पाठक यांना २९ जानेवारीला वाढदिवसाचे कार्ड पाठवले होते. यादव यांनी मिथाली पाठक यांच्या फेसबूक खात्यावरून छायाचित्र डाऊनलोड करत ते वाढदिवसाच्या कार्डसमवेत जोडले होते. त्यांनी याविषयी कोणतीही अनुमती घेतली नव्हती. यादव फेसबूकवर न्यायाधिशांच्या मित्रांच्या सूचीत नसल्याने अनधिकृतपणे छायाचित्राचा वापर केल्याने त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत तक्रार करण्यात आल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे.


१३ फेब्रुवारीला यादव यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाने जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादव यांनी ‘माझ्यावर अनावश्यक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायाधिशांच्या प्रतिमेला धक्का पोचवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला इंटरनेट आणि सामाजिक माध्यमे यांची  इतकी माहिती नाही’, असा दावा त्यांनी केला आहे.