सातारा नगर परिषदेचे अंदाजपत्रक फेटाळण्याची मागणी

सातारा – सातारा नगरपालिकेने सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ आणि महाराष्ट्र लेखासंहिता नियम यांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे सातारा नगर परिषदेचे अंदाजपत्रक फेटाळण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अशोक मोने आणि अमोल मोहिते यांनी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे केली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की,

. नगर परिषदेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक केवळ आकडेवारीचा खेळ आहे. यामध्ये विकासासाठी दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. मागील अर्थसंकल्पातील बहुतांश अटींची पूर्तता केलेली नाही.

२. अनेक ठिकाणी नमूद अंदाजापेक्षा अधिक रक्कम दर्शवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी संमत करण्यात आलेली रक्कम व्यय करण्यात आलेली नाही. नगर परिषदेच्या नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांचा पुरता बोजवारा उडाला आहे.

३. नगर परिषद सीमावाढीमुळे समाविष्ट झालेल्या भागासाठी अंदाजपत्रकात कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. गोडोली तळे आणि हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेली रक्कम कोणत्या पद्धतीने उपयोगात आणणार याविषयी स्पष्टता नाही. कै. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या नावे चालू असलेली शिष्यवृत्ती बंद करण्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

त्यामुळे हे अंदाजपत्रक फेटाळून आवश्यक दुरुस्ती करून पुनश्‍च अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात यावे.