कॉटन ग्रीन आणि शिवडी या रेल्वे स्थानकांच्या मधे युवतीच्या हातातील भ्रमणभाषची चोरी

चोरीची तक्रार प्रविष्ट करण्यास २ घंट्यांचा विलंब

नागरिकांनो, लोकलच्या दरवाज्यात भ्रमणभाष घेऊन उभे रहातांना सतर्कता बाळगणेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या !

(प्रतिकात्मक)

मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रगती सरफरे ही युवती सायंकाळी ७ ते ७.१५ च्या सुमारास कामावरून परततांना पनवेल लोकलमध्ये चढली. शिवडी स्थानकाला उतरायचे असल्याने ती कॉटन ग्रीन स्थानकानंतर दरवाज्यात येऊन उभी होती. लोकल कॉटन ग्रीन आणि शिवडी यांच्या मधे असतांनाच अचानक तिच्या हातावर जोरात फटका बसला अन् तिच्या हातातील भ्रमणभाष खाली पडला. ती शिवडी स्थानकावर उतरल्यावर त्याच लोकलमधील आणखी एका मुलाचा भ्रमणभाषही चोरीला गेला असल्याचे लक्षात आले. स्थानकावर उपस्थित असलेल्या आर्.पी.एफ्. जवानांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली; पण तोपर्यंत चोर तेथून पळून गेले होते.

प्रगतीचे पती सुशांत यांनी सांगितले की, चोरीच्या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आम्हाला वडाळा स्थानकात जाण्यास सांगितले. घरात कुणीही नसल्याने आम्ही आमच्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन वडाळा स्थानकात गेलो. तेथे २ घंट्यांनी आमची तक्रार प्रविष्ट करण्यात आली. (साधी तक्रार देण्यासही इतका विलंब करणारे कर्तव्यचुकार रेल्वे पोलीस प्रशासन ! – संपादक)