विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा ! – प्रकाश नाईक, माहिती अधिकारी, गोवा
शिरोडा येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन साजरा
फोंडा – विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवायला हवी. भ्रमणभाषच्या (मोबाईलच्या) वापरासारख्या अनावश्यक गोष्टींमध्ये आपला अमूल्य वेळ दवडण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाला अधिकाधिक वेळ द्यावा, असे उद्गार माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे माहिती अधिकारी श्री. प्रकाश नाईक यांनी काढले. ‘भारतमाता की जय’ या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या शिरोडा शाखेने २२ फेब्रुवारीला शिरोडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मातृभाषादिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शिरोडा ग्रामपंचायत पातळीवर हस्तलेखन आणि वाचन स्पर्धा आयोजित केल्याविषयी श्री. प्रकाश नाईक यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि त्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास साहाय्य होऊन आत्मविश्वास वाढतो अन् त्यांच्यातील छुप्या प्रतिभेचे दर्शन घडते, असे श्री. नाईक पुढे म्हणाले. त्यांनी मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेने केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतलेले थोर गोमंतकीय वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे उदाहरण देऊन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे महत्त्व प्रतिपादिले. प्रतिवर्षी २१ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत मातृभाषादिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय एकता बळकट करण्यासाठी आणि आपली कला अन् संस्कृती आणि मातृभाषेचे संवर्धन अन् समृद्धी साधण्यासाठी मुलांमध्ये बाल्यावस्थेपासूनच एकता आणि राष्ट्रप्रेम यांची ज्योत जागवणे आवश्यक असल्याचे श्री. प्रकाश नाईक यांनी पुढे सांगितले.