संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

  • देश-विदेशातील १२ सहस्र जणांनी केला अभ्यास

  • महाराष्ट्रातील सर्वच संतांच्या साहित्याचा अभ्यास होण्यासाठी संत एकनाथ महाराज मिशन

संत एकनाथ महाराज यांची शिकवण जगभरात पोचवणार्‍या मिशनचे कार्य अभिनंदनीय आहे. सहस्रो भाविकांनी याचा लाभ करून घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. संतांची शिकवणच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी भाविकांनी याचा अधिकाधिक प्रसार करावा, हीच संतांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता होय.


पुणे – संत एकनाथ महाराज यांचा शांती आणि समता यांचा संदेश सर्वत्र पोचवणे, साहित्याचा प्रचार करणे या उद्देशाने संत एकनाथ महाराज यांच्या नावाने चालवल्या जाणार्‍या पैठणच्या शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज मिशनच्या वतीने वारकरी संप्रदाय ‘ऑनलाईन’ परीक्षा (अभ्यासक्रम) हा उपक्रम राबवला जात आहे. यात आतापर्यंत महाराष्ट्र आणि देशाबाहेरील अनुमाने १२ सहस्र जणांनी सहभाग घेऊन संत साहित्याचा अभ्यास केला आहे. संत एकनाथ महाराज यांचे १५ वे वंशज योगिराज महाराज गोसावी यांनी वर्ष २००६ मध्ये संत एकनाथ महाराज यांच्या नावाने संस्थेची स्थापना करून संकेतस्थळही चालू केले. यावर साहित्याचे भांडार समृद्ध करून मराठी भाषेचा गोडवा वाढवणार्‍या संत एकनाथ महाराज यांचे सर्व साहित्य उपलब्ध केले.

योगिराज महाराज गोसावी म्हणाले की, वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या साहित्याचा समावेश करूनच ४ वर्षांपासून ‘ऑनलाईन’ अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीने, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर रहाणार्‍या मराठीप्रेमींनी, तसेच संत साहित्याची आवड असणार्‍या जगभरातील सर्वांना संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा, याच हेतूने अभ्यासक्रमाची रचना केली आहे. त्यामुळेच आतापर्यंत महाराष्ट्रासह विदेशातील मराठी माणसांनीही अभ्यास पूर्ण केला आहे. ​

कुठेही न जाता, केवळ भ्रमणभाषचा वापर करून संत साहित्याची आवड असणार्‍या कुणालाही यात सहभाग घेता येतो. एकनाथी भागवताचे ‘ऑनलाईन’ पारायण हा उपक्रमही चालवला जात आहे. सध्या ६ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर १ सहस्र ५०० जणांनी पारायणात सहभाग घेतला आहे.