कुणकेश्वर यात्रा रहित; मात्र नित्योपचार चालू रहाणार ! – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची ११ ते १३ मार्च या कालावधीत होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहित करण्यात आली आहे. यात्रा रहित झाली असली, तरी यात्रेच्या कालावधीत देवस्थान समितीच्या विश्वस्तांसह केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत देवस्थानचे नित्योपचार, तसेच इतर धार्मिक विधी पार पाडता येतील; मात्र हे विधी पार पाडत असतांना त्यामध्ये किमान अर्ध्या घंट्याचे अंतर ठेवावे. मंदिरात कोरोनाविषयीच्या सर्व निकषांचे पालन करण्यात यावे. आरोग्य विभागाने या ठिकाणी पथक नेमावे. मंदिरात भाविकांनी एकत्रित गर्दी करू नये. कुणकेश्वर ग्रामस्थांनी यात्रा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या विश्वस्तांसह पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.
या आढावा बैठकीसाठी प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुति कांबळे, पोलीस, देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय वाळके, सचिव बाळकृष्ण मुणगेकर, सरपंच गोविंद घाडी, मंदिर व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते.