म्यानमारमध्ये सैन्याच्या गोळीबारात १८ आंदोलक ठार

यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये सैन्याने बंडखोरी करत देश नियंत्रणात घेतल्यानंतर जनतेकडून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलकांवर सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १८ जण ठार झाले, तर ३० हून अधिक जण घायाळ झाले. तसेच अनेकांना अटक करण्यात आली.

ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवीहक्क आयोगाने दिली. ‘आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराचा आम्ही निषेध करतो. सैन्याने  शांततापूर्ण आंदोलकांच्या विरुद्ध बळाचा वापर करू नये’, असे आवाहन करत असल्याचे आयोगाच्या प्रवक्त्या रवीना शामदासानी यांनी म्हटले आहे.

गेले एक मास जनतेकडून आंदेलने चालू आहेत. ती मोडून काढण्यासाठी आंंदोलकांची धरपकड, तसेच अश्रुधूराचा वापर करण्यात आला. सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.