मंदिराच्या फरशीवर डमरू आणि त्रिशूळ यांची चित्रे रंगवल्याने ती अनेक भक्तांच्या पायदळी तुडवली जाणे
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचे एक उदाहरण
‘मी काही दिवसांपासून प्रतिदिन एका मंदिरात दर्शनासाठी जाते. एके दिवशी मी मंदिरात गेल्यावर सहज माझे लक्ष फरशीकडे गेले. तेव्हा लाल रंगाच्या मोठ्या चौकोनाच्या बाजूने लहान आकारात चित्र असल्याचे मला दिसले. ते चित्र कशाचे आहे ? याची उत्सुकता वाटल्याने मी त्या फरशीजवळ जाऊन बारकाईने पाहिले, तर चौकोनात लहान आकारात डमरू आणि त्रिशूळ यांची चित्रे रंगवली होती. ते पाहून माझ्या लक्षात आले की, मी मंदिरात जायला लागल्यापासून ९ दिवसांनंतर मला ते चित्र दिसले. ते चित्र भक्त येण्या-जाण्याच्या वाटेवरच असल्याने मी ९ दिवस त्या चित्रांवरूनच ये-जा करत होते. मंदिरात येता-जाता माझ्यासह अनेक भक्तांच्या पायदळी ती चित्रे प्रतिदिन तुडवली जात आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात. या सिद्धांतानुसार डमरू आणि त्रिशूळ या चित्रांच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व तेथे आकर्षित झालेले असते. डमरू आणि त्रिशूळ यांची चित्रे रेखाटायची जमीन ही जागा नाही. आपल्या घरातही प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असते. ज्याप्रमाणे सिलिंडरची जागा गॅसच्या शेगडीजवळच हवी, त्याचप्रमाणे देवता आणि तिची आयुधे यांचे स्थान देवघरातच हवे. कलियुगात हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नसल्याचा हा परिणाम आहे. भूमीवर डमरू आणि त्रिशूळ यांची चित्रे रंगवू नयेत, हे मंदिर व्यवस्थापन आणि तेथील पुजारी या कुणाच्याही लक्षात येऊ नये, ही आश्चर्याची गोष्ट आहे. ‘अशांचा देवाप्रती भाव नसून केवळ ते नोकरी म्हणून तेथे पूजा-अर्चा करतात कि काय ?’, असा मनात विचार आला. त्या चित्रांवरून प्रतिदिन ये-जा करणार्या भक्तांच्या पायदळी चित्रे तुडवली जाण्याचे पाप मंदिर व्यवस्थापन आणि तेथील पुजारी या दोघांनाही लागत असणार. त्यासाठी त्यांनी त्वरित ती चित्रे पुसून टाकायला हवीत.
हिंदूंना मंदिरांतून धर्मशिक्षण द्यायला हवे; पण जिथे मंदिरातच अशा प्रकारे धर्माची हानी होत असेल, तर हिंदूंनी धर्मशिक्षणाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची ? यासाठीच सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, गोवा. (२२.२.२०१९)
मंदिरात भूमीवर फुलाच्या पाकळ्यांच्या आकारात काळ्या रंगाच्या फरशा बसवल्या असल्याने त्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होऊन मंदिराची सात्त्विकता न्यून होत असणे
‘मी काही दिवसांपासून प्रतिदिन एका मंदिरात दर्शनासाठी जाते. एक दिवशी मी मंदिरात गेल्यावर तेथील फरशीकडे माझे सहज लक्ष गेले. तेव्हा मंदिरात प्रवेश केल्यापासून गाभार्यापर्यंत ठराविक अंतरावर तीन ठिकाणी एका मोठ्या चौकोनात फुलाच्या पाकळ्यांच्या आकारात काळ्या रंगाच्या फरशा बसवल्या आहेत. फुलांकडे पाहून मन प्रसन्न होते; पण काळ्या रंगाच्या फरशीच्या फुलाकडे पाहून मन प्रसन्न न होता उलट काळ्या रंगातून रज-तम प्रक्षेपित झाल्याने मंदिरातील सात्त्विकताही न्यून होत आहे. त्यामुळे काळ्या रंगाच्या फरशा न वापरता अन्य रंगाच्या फरशा वापरायला हव्यात, एवढेही मंदिर व्यवस्थापन, तेथील पुजारी आणि दर्शनाला येणारे भक्त या कुणाच्याच लक्षात कसे येत नाही ?
असे मंदिर व्यवस्थापन आणि पुजारी यांच्यावर देवाची कृपा कशी होणार ?’
– कु. तृप्ती कुलकर्णी, गोवा. (२२.२.२०१९)
सनातन संस्थेची ‘मंदिर पावित्र्य रक्षण मोहीम’साधकांना सूचना आणि वाचक अन् धर्माभिमानी यांना विनंती ! या लेखात दिल्याप्रमाणे अनेक मंदिरांची दुरवस्था असते. त्याचा तेथील पावित्र्यावर परिणाम होतो. आपल्यालाही तीर्थक्षेत्री अथवा अन्य मंदिरांत असे काही चांगले किंवा वाईट अनुभव आले असतील, तर त्यासंदर्भातील माहिती ‘सनातन प्रभात’ला कळवा आणि सनातन संस्थेच्या ‘मंदिर पावित्र्य रक्षण मोहीमे’त सहभागी व्हा ! ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. धर्मजागृतीसाठी आणि हिंदूंचे प्रबोधन करण्यासाठी त्या अनुभवांचा उपयोग होईल. संपर्क : प्रा. महावीर श्रीश्रीमाळ पत्रव्यवहारासाठी पत्ता : २४/बी, सनातन आश्रम, पोस्ट बॉक्स क्र. ४६, रामनाथी, फोंडा, गोवा. ई-मेल : dspgoa1@gmail.com संपर्क क्रमांक : (०८३२) २३१२६६४ |