छत्रपती शिवरायांचा मावळा व्हा !

आज अनेक ठिकाणी हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान, ‘लव्ह जिहाद’, गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर यांसारख्या घटना घडत आहेत. या घटनांवर अनेक हिंदु धर्मीय व्यक्ती सामाजिक माध्यमांत निषेध व्यक्त करणे, तसेच या घटनांवर चर्चा करतांना वा राग व्यक्त करतांना दिसून येतात. हा राग व्यक्त करतांनाही हिंदु धर्मावरील आघात रोखले जावेत, हीच त्यांची तळमळ असते; मात्र हे रोखण्यासाठी योग्य दिशा मिळत नसल्याने केवळ सामाजिक माध्यमांत चर्चांचे लोट उठतात आणि घटना घडून काही कालावधी लोटला की, त्याचा विसरही पडतो. याचाच अर्थ अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या मनात हिंदुत्वाविषयी निष्ठा असते; मात्र त्याला योग्य दिशा न मिळाल्याने त्या घटनेविषयीची चीड कालांतराने न्यून होऊन जाते.

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी व्यतीत केले. त्यांनी धर्मासाठी प्रसंगी प्राणही त्यागले. प्रत्येक मावळ्याला हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी योग्य प्रशिक्षण देऊन घडवले. हे सर्व करतांना त्यांनी विविध संतांचे मार्गदर्शन, तज्ञ मंडळींचा सल्ला घेणे, विविध देवतांचे आशीर्वाद घेणे, हेही केले. त्यामुळे वर्षातून एकदा केवळ शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य अव्याहतपणे करण्यासाठी प्रतिदिनच कसे प्रयत्न होतील ? या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांनी विचार करायला हवा.

प्रत्येक कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान असल्यास ते कार्य निश्‍चितपणे सिद्धीस जाते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे मोठे ध्येय ठेवून हिंदुत्वाचे कार्य करूया. एखाद्या पक्षाचा नेता अथवा कार्यकर्ता बनण्यापेक्षा ‘मला छत्रपती शिवरायांचा मावळा बनायचे आहे’, हे ध्येय ठेवून प्रयत्न करायला हवेत. केवळ सामाजिक माध्यमांवर हिंदुविरोधी घटनेविषयी रोष व्यक्त करत रहाण्याऐवजी संतांच्या मार्गदर्शनानुसार हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे, तसेच हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक आहे.

– श्री. संतोष पाटणे, सांगोला, जिल्हा सोलापूर.