मनातील सहसाधकांविषयीच्या नकारात्मक विचारांवर मात करून त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कु. महानंदा पाटील यांनी केलेले प्रयत्न !
मनातील सहसाधकांविषयीच्या नकारात्मक विचारांवर मात करून त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांनी केलेले प्रयत्न !
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेल्या गृहपाठानुसार ‘कुणाविषयी मनात नकारात्मकता आहे आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, याविषयी मी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.
१. प्रसंग १
१ अ. अत्तर बांधणीच्या ५० खोक्यांवर शिक्के मारलेले असतांना सहसाधकाने आणखी ३५ खोके शिक्के मारून दुमडण्यास दिल्यावर ‘ते जर संपले नाहीत, तर ते शिल्लक रहाणार’, या विचारामुळे परिस्थिती स्वीकारतांना संघर्ष होऊन मनात नकारात्मक विचार येणे : ‘एक दिवस मी सकाळी ९.३० वाजता सेवेच्या ठिकाणी गेले असतांना सहसाधकाने बाहेरून आलेल्या २ साधिकांना बांधणीच्या ३५ खोक्यांवर सनातन-निर्मित केवडा अत्तराचे शिक्के मारून ते दुमडण्याची सेवा दिल्याचे मी पाहिले होते. तेव्हा मी सहसाधकांना काहीच बोलले नाही; पण माझ्या मनात विचार प्रक्रिया चालू झाली. सहसाधकांच्या जवळ जाऊन मी त्यांना म्हणाले, ‘‘काका, मी आधीच केवडा अत्तर बांधणीच्या ५० खोक्यांवर शिक्के मारून ठेवले आहेत आणि तुम्ही हे आता आणखी ३५ खोके मला न विचारता शिक्के मारून ठेवले. जर हे संपले नाही, तर ते पडून रहाणार.’’ तेव्हा काका मला म्हणाले, ‘‘दुसरी सेवाच नव्हती; म्हणून मी शिक्के मारायला सांगितले.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘काका, मला विचारायचे तरी होते. प्रत्येक ठिकाणी उत्तरदायी साधक आहेत. त्यांना असे न विचारता तुम्ही केले असते का ? ‘तुम्ही उत्तरदायी साधक आहात. तेव्हा तुम्हाला कोण विचारणार आहे ?’, असे तुम्हाला वाटले का ?’’
१ आ. मनातील नकारात्मक विचारांमुळे चिडचिड होणे, सहसाधकामधील गुरुकार्याच्या तळमळीमुळे त्यांच्याकडून समष्टी सेवाच झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्याशी जुळवून घेता येणे आणि सत्संगात त्याविषयी सांगून क्षमा मागणे : ‘साधिका सेवेला आलेल्या असल्यामुळे काकांनी त्यांना सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे साधिकांचा वेळ वाया गेला नाही. काकांना गुरुकार्याची तळमळ असल्याने त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी समष्टी सेवाच केली. सेवा नाही, तर ते थांबले नाहीत. संबंधित साधकांची वाट पहाण्याऐवजी त्यांनी सेवा उपलब्ध करून दिली. ‘त्यांच्यातील तळमळ शिकण्यासारखी आहे’, असा सकारात्मक विचार करून मी काकांशी जुळवून घेतले. माझ्या मनातील नकारात्मक विचारांमुळे माझी चिडचिड झाली. माझ्या मनाची नकारात्मक स्थिती मी सेवेच्या आढावा सत्संगात सांगून क्षमा मागितली. तेव्हा माझ्याकडून झालेल्या चुकीच्या विचारांसाठी मी वैयक्तिक वेळेत १५ मिनिटे सेवा केली.
१ इ. ‘या प्रसंगातून अन्य साधक कसे चुकतात आणि मी कशी योग्य असते’, या अयोग्य विचाराची मला जाणीव झाली. हे अयोग्य विचार दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीन.
२. प्रसंग २
२ अ. सहसाधकाच्या अयोग्य कृतींमुळे मनात पूर्वग्रह आणि नकारात्मक विचार येऊन त्यांच्याशी जुळवून घेणे अडचणीचे होणे : ‘एका सहसाधकाविषयी माझ्या मनात नकारात्मकता होती. अत्तराचा साठा आणल्यावर अत्तराचे ‘सॅम्पल’ काढून बाटल्या त्यांना नेऊन द्याव्या लागतात. ते कधीच स्वतःहून बाटल्या नेण्यासाठी येत नाहीत. त्यांना बाटल्या नेऊन दिल्यावर ते त्या परतही करत नाहीत. बाटल्या त्यांच्या हातात द्याव्या लागतात. मला कितीही घाई असली, तरी ते साहाय्य करत नाहीत. त्यांचे काम एखाद्या राजासारखे असते. ‘सॅम्पल’ बाटलीला ‘रोलर’ लावलेले आहे का ? ते तपासून बाटलीला ‘रोलर’ लावून बाटली त्यांच्याकडे नेऊन द्यायची. ‘सॅम्पल’ तपासून झाल्यावर मीच ती बाटली मागून घ्यायची. बाटलीला लावलेला ‘रोलर’ काढून बाटलीला बूच लावून झाकण लावून ठेवायचे इत्यादी; कारण ते स्वतःहून अशी कोणतीच कृती करत नाहीत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात नकारात्मकता होती. त्यामुळे मला त्यांच्याशी जुळवून घ्यायला अडचणीचे होत होते.
२ आ. तातडीची सेवा चालू असतांना सहसाधकाने अकस्मात् सेवा सांगितल्याने आणि ‘त्या सेवेविषयी पूर्वकल्पना द्यायला हवी’, अशी अपेक्षा असल्याने राग उफाळून येणे : ५.२.२०२० या दिवशी मी पुष्कळ घाईत होते. नवीन खोक्यांचा साठा आला होता. मी ‘लेबल’ लावण्याची सेवा करण्याच्या घाईत होते. तेव्हा सहसाधक येऊन मला म्हणाले, ‘‘जुन्या आणि नवीन साठ्यांतील प्रत्येकी १ – १ खोका मला द्या. मला गोव्याला पाठवायचा आहे.’’ त्या वेळी ‘सहसाधक अकस्मात् येऊन सांगतात. आधी का सांगत नाहीत ?’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात आले. तेव्हा माझ्यातील ‘राग येणे’, हा स्वभावदोषही उफाळून आला होता.
२ इ. साधकाला तत्परतेने साहाय्य केल्याने प्रेमभाव वाढणार असल्याची जाणीव होणे आणि गुरुकार्य अधिकाधिक चांगले होण्यासाठी साधक सेवेचा अभ्यास करत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यातील तो गुण शिकण्याविषयी सकारात्मक विचार करणे : ‘सहसाधक खोके मागायला आल्यावर ते आणि मी दोघेही गुरुकार्य करत आहोत. ते जर खोके मागायला आले आहेत, तर ‘नंतर या, नंतर देते’, असे सांगून त्यांना अडवून का ठेवायचे ? ‘त्यांना अडवून ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांची सेवा वेळेवर करू द्यावी’, असा सकारात्मक विचार करून मी त्यांना लगेच खोके काढून दिले. त्यानंतर ते पुन्हा येऊन मला म्हणाले, ‘‘१ नवीन आणि १ जुना वजन करण्यासाठी असे आता २ गठ्ठे (१०० खोक्यांचा १ याप्रमाणे) द्या.’’ मी शांत राहून त्यांना २ गठ्ठे दिले. त्या वेळी मी पाहिले, तर ते अभ्यास करत होते. खरे तर मीही ते शिकून घ्यायला पाहिजे होते. त्यांच्यातील गुण पहायला पाहिजेत. ‘त्यांना जे हवे, ते खोक्यांचे गठ्ठे काढून दिले, तर माझ्यातील प्रेमभाव वाढायला साहाय्य होणार आहे आणि माझ्या मनातील त्यांच्याविषयीची नकारात्मकता निघून जाणार आहे’, या दृष्टीने यापुढे मी प्रयत्न करीन.’
– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२०)