देवाने साधिकेला नामजपाचे महत्त्व भावप्रयोगातून सांगणे
‘एकदा मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून नामजप करत होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली आणि भगवंताला विचारले, ‘मी भावपूर्ण नामजप कसा करू ?’, ते तूच मला सांग.’ तेव्हा भगवंताने मला सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. देवाने नामजपाचे सांगितलेले महत्त्व !
अ. ‘नामस्मरणाची जो कास धरी ।
तो भवसागर पार करी ॥
आ. ‘कलियुगात सर्वश्रेष्ठ साधना म्हणजे नामसाधना ! नामजप करण्यासाठी पैसा-अडका किंवा शक्ती लागत नाही. अशी ही सर्वांग सुंदर उपासना आहे. अखंड रामनामाने वाल्या कोळ्याचे वाल्मीकिऋषि झाले. ध्रुवबाळाने नामजपाने अढळपद प्राप्त केले, तर भर सभेत द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी श्रीकृष्णाने तिला वस्त्रे पुरवली. नाम हे देवाकडे नेणारी पायवाट आहे, तर मोक्षाच्या द्वाराची पहिली पायरी आहे.
इ. नाम घेतांना वार्याच्या झंझावाताप्रमाणे मनात विचार येतात. हे विचार भूतकाळातील किंवा भविष्यकाळातील असतात. भूतकाळातील विचारांमुळे पूर्वग्रहात वाढ होते, तर भविष्यातील विचार व्यक्तीला चिंतातुर करतात. अशा अनावश्यक, नकारात्मक आणि निरर्थक विचारांना थोपवण्याचे सामर्थ्य एकट्या नामजपात आहे.
ई. नामजपाला बसल्यावर मनात एवढे विचार येतात की, ‘नको ते नाम घेणे’, असे वाटते. तेव्हा साधकांनो, विचार येतात, तर येऊ द्या आणि जातात, तर जाऊ द्या. त्याकडे दुर्लक्ष करा आणि मन नामजपाकडे एकाग्र करा.
२. नामजप कसा करावा ?
प्रथम देवाला संपूर्णपणे शरण जावे आणि त्याला कळकळीने, आर्ततेने, तळमळीने प्रार्थना करावी.
३. नामजप करतांना करावयाच्या प्रार्थना
अ. हे भगवंता, मला तुझे नाम घ्यायचे आहे. तूच माझ्याकडून गुरुदेवांना अपेक्षित असा नामजप करवून घे. ‘तुझ्या चरणांपर्यंत पोचेल’, असा नामजप माझ्याकडून करवून घे.
आ. हे भगवंता, भक्त प्रल्हादासारख्या दृढ श्रद्धेने, मीराबाईसारखा व्याकुळतेने आणि द्रौपदीसारख्या आर्तभावाने तूच माझ्याकडून नामजप करवून घे.
इ. हे भगवंता, नामजप करतांना येणारे सर्व अडथळे दूर होऊ देत. विचारांचे अडथळे दूर होऊ देत. नामजप करतांना माझी अंतर्मुखता वाढू दे.
ई. हे भगवंता, मला तुझ्या नामाची गोडी चाखता येऊ दे. मला तुझ्या नामाच्या प्रेमात पडता येऊ दे आणि देवा, ‘मला नामाविना काही सुचणारच नाही’, असे तू कर.
४. नामजप आणि प्रार्थना करतांना अंतरीचा भाव जागृत होण्यासाठी करायचा भावप्रयोग
या प्रार्थना करतांना इष्टदेवतेचे रूप डोळ्यांसमोर आणून डोळे मिटून ते रूप आठवत चरणांवर दृष्टी स्थिर ठेवूया. तेव्हा अंतरीचा भाव जागृत होण्यासाठी करायचा लहानसा भावप्रयोग पुढे दिला आहे.
४ अ. भावप्रयोग
१. आपण सर्व जण देवाच्या चरणांजवळ बसून नामजप करत आहोत. आपण हाताच्या ओंजळीत ताजी टवटवीत सुगंधी पारिजातकाची फुले आणि तुळशीपत्रे घेऊन भगवंताच्या चरणांवर अर्पण करत आहोत. ‘एक फूल वहाणे, म्हणजे एक नाम घेणे’, या शरणागतभावाने लीन होऊन नामजप करूया. फुले देवाच्या चरणांवर अर्पण झाल्याने त्या फुलांना आनंद होत आहे. ‘ती स्पंदने आपल्याला अनुभवता येऊ देत’, अशी प्रार्थना करूया. एका दिवसाचे आयुष्य असलेली फुले देवाच्या चरणी अर्पण झाली आणि त्यांचे जीवन सार्थकी लागून त्यांनी त्यांचा उद्धार करवून घेतला; कारण त्यांच्यात कोमलता, मनमोहकता आणि सुंदरता असा समर्पणाचा भाव आहे. या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी आनंदप्राप्ती, म्हणजेच ईश्वरप्राप्ती करवून घेतली आहे.
२. ‘हे भगवंता, मलाही फुलांप्रमाणे तुझ्या चरणांजवळ घे. फुलांत अल्प अहं आहे आणि त्यांच्यात तुझ्या भेटीची आस अधिक आहे. देवा, माझी तशी तळमळ नाही किंवा तसे गुणही नाहीत. देवा, तुला मी कशी भेटू ? मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं तुझ्यापासून दूर नेत आहेत. मला तुझ्या चरणांशी घे’, असा देवाच्या समवेत संवाद साधतांना फुले आनंदी झाली आणि मलाही आनंद दिला. तेव्हा चैतन्य मिळाले आणि नामजप अंतर्मनातून करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होऊ लागला. माझा वैखरीतून होणारा नामजप आता भावपूर्ण होऊ लागला. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले. माझ्या डोळ्यांसमोर मला देवतेचे रूप आणि चरण दिसल्यामुळे ‘प्रत्यक्ष देव (गुरु) उभा आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केल्याने नामजप अधिकाधिक गुणात्मक आणि भावपूर्ण होऊ लागला.
३. मी वातावरणात (हवेत) नामजप लिहित आहे. माझे लक्ष नामाकडे असल्यामुळे त्यातील सर्व अडथळे दूर होत आहेत. आता मी नामजप प्रत्येक अवयव आणि पेशी यांवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझे मन नामात व्यस्त आहे. आरंभी माझा नामजप वरवरचा होत होता. आता नामजप अंतर्मुखतेने होत आहे. माझी नामातील अंतर्मुखता वाढल्याने माझे आजूबाजूचा आवाज किंवा हालचाली यांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे मनाला चांगले वाटत आहे. मला नामजपामुळे मिळालेली ऊर्जा आणि शक्ती माझ्यावरील आवरण काढण्यास साहाय्य करत आहेत. आपण प्रतिदिनी प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक नामजप करण्याचा प्रयत्न करूया.
४. ‘नाम’ हा शब्द उलटा लिहिल्यास ‘मना’, असे लिहिले जाते. तेव्हा ‘मना’, म्हणजेच ‘मी’ किंवा ‘स्व’ नाही, म्हणजेच मीपणा नष्ट करणारे नाम हे ईश्वराकडे जाण्याची पहिली पायरी आहे.
‘हे भगवंता, माझ्याकडून असे प्रयत्न होत नाहीत. तू मला ही सूत्रे समष्टीसाठी सुचवली आहेस. देवा, माझ्या माध्यमातून तूच लिहून घेतले आहेस. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |