कुटुंबातील व्यक्ती कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असतांना श्री. अतुल देव यांना नामजप आणि गुरुकृपा यासंदर्भात आलेल्या अनुभूती
‘साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य टिकून रहावे, यासाठी संत सातत्याने जाणीव करून देत असतात. ‘काळ ‘आ’ वासून पुढे उभा आहे आणि प्रारब्धाचे डोंगर शिरावर आहेत’, या संतवचनाची प्रचीती कोरोना महामारीच्या रूपात आलेल्या आपत्काळात मला काही प्रमाणात अनुभवता आली. याविषयी मागील २ मासांच्या कालावधीत आलेले अनुभव येथे दिले आहेत.
१. ताप आल्यावर उपचार घेऊनही प्रकृतीमध्ये सुधारणा न होणे
माझ्या लहान भावाला ताप येत होता आणि श्वसनाचा त्रासही होत होता. प्रारंभी त्याने नेहमीच्या आधुनिक वैद्यांकडून उपचार घेतले; मात्र ३ दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे २.६.२०२० या दिवशी त्याने तो काम करत असलेल्या ठाणे येथील ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ या प्रथितयश रुग्णालयात उपचारासाठी स्वतःला भरती करून घेतले.
२. कोरोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर ‘न्यूमोनिया’ असल्याचेही निदान होणे
३.६.२०२० या दिवशी भावाची कोरोनाची चाचणी करण्यात आली. दुसर्या दिवशी तो कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यातच त्याला ‘न्यूमोनिया’ असल्याचे निदान आले. त्यामुळे ५.६.२०२० या दिवसापासून त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण अतिशय न्यून झाले. त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ‘व्हेंटिलेटर’ची आवश्यकता पडणार होती. यामध्ये कोणता अडथळा येऊ नये, यासाठी कुटुंबियांना नामजपादी उपाय करण्यास सांगितले.
३. रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे उपचार करण्याचे आश्वासन देणे
कुटुंबीय साधना करत नसल्यामुळे ते या प्रसंगात गांगरून गेले. त्यामुळे मी भावासाठी नामजप करण्यास प्रारंभ केला. भावाला ज्या रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते, ते ‘कोरोना उपचारासाठीचे रुग्णालय नव्हते. त्यामुळे आम्ही त्याला अन्य रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्या ठिकाणी भावाची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे भावाला आम्ही पुन्हा तो कामाला असलेल्या ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ येथे उपचाराकरता आणले. त्या वेळी तेथील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांनी मला माझ्या भावावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे उपचार करण्याचे आश्वासन दिले.
४. आठ दिवसांच्या उपचारानंतर बरे झाल्यावरही ऑक्सिजनचे प्रमाण आणि हृदयाचे ठोके आवश्यक त्या प्रमाणात होण्यासाठी उपचार चालू ठेवणे
भावाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवून उपचार चालू करण्यात आले. त्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी मी त्याच्या छायाचित्राजवळ भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवला. ८ दिवसांच्या उपचारानंतर भावाला शुद्ध आली. ‘न्यूमोनिया’तून तो बरा झाला; परंतु ऑक्सिजनचे प्रमाण आणि हृदयाचे ठोके आवश्यक त्या प्रमाणात येण्यासाठी आणखी काही कालावधी आवश्यक होता. पुढे २९.६.२०२० पर्यंत उपचार चालू ठेवल्यानंतर त्याच्या प्रकृतीत किमान सुधारणा झाली. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. भावाला शुद्ध आल्यावर त्यानेही नामजप करण्यास आरंभ केला.
५. नामजपामुळे तणाव पूर्णपणे न्यून होऊन अतिशय शांत जाणवणे
नामजप, विश्रांती, उपचार आणि नियमित व्यायाम यांमुळे पूर्णपणे बरा होऊन २ मासांनतर भाऊ कामावर जायला लागला. ‘नामजपामुळे तणाव पूर्णपणे जाऊन अतिशय शांत जाणवले’, असे भावाने सांगितले आणि प्रत्यक्षातही त्याचा तोंडवळा प्रसन्न जाणवत होता.
६. अनुभूती
६ अ. गुरुकृपेमुळे प्रारब्धातील भार हलका झाल्याची अनुभूती येणे : भावाच्या उपचारासाठी लागलेला कालावधी आणि उपचारांची गुणवत्ता लक्षात घेता, त्यासाठी १५ ते २० लाख रुपये इतका व्यय सहज झाला असता; परंतु रुग्णालय प्रशासनाने सर्व उपचार विनामूल्य केले. मागील काही वर्षांपासून भाऊ नियमितपणे मासिक अर्पण करत असल्याने गुरुकृपेमुळे त्याच्या प्रारब्धातील हा मोठा भार हलका झाल्याचे मला जाणवले.’
– श्री. अतुल देव, ठाणे (ऑगस्ट २०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |