पोलिसांची इतकी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
मुंबई – संजय राठोड यांच्या विषयाचे ऑडिओ रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. १०० क्रमांकावरील कॉल आहेत, ४५ ‘मिस्ड कॉल’ केलेले आहेत. एवढे पुरावे असतांना पोलीस संजय राठोड यांच्यावर कारवाई का करत नाहीत ? पोलिसांची इतकी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करणार्या पोलीस निरीक्षकांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. १ मार्चपासून चालू होणार्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘धनंजय मुंडे प्रकरणात संबंधित महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. महिलेने तक्रार मागे घेतली असली, तरी हा प्रश्न सुटलेला नाही’, असेही ते या वेळी म्हणाले.
संत नामदेव महाराजांच्या ७०० व्या जयंती वर्षानिमित्त शासनाने कार्यक्रम घ्यावेत !
संत नामदेव महाराज यांच्या ७०० व्या जयंती वर्षानिमित्त पंजाब शासनाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत; मात्र महाराष्ट्रात अद्यापही कार्यक्रम केलेले नाहीत. सरकार महनीय व्यक्तींची सूची सिद्ध करत असते. त्यामध्ये संत नामदेव यांचे नाव का आले नाही ? शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन कार्यक्रम तात्काळ घोषित करावेत.
काँग्रेसच्या नादी लागून शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करू नये !
शिवसेनेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विसर पडला आहे. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले नाही किंवा ट्वीटही केले नाही. एवढी लाचारी का ? काँग्रेसने जन्मभर सावरकर यांच्यावर अन्याय केला आहे. त्याहीपेक्षा सत्तेची लाचारी पत्करून सावरकर यांच्यावर अन्याय होत आहे, याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या नादी लागून शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करू नये.