पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंद रहाणार ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

डॉ. राजेश देशमुख

पुणे,  २८ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे जिल्ह्यात कोविड १९ च्या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश १४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने शासकीय आणि खासगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी शिकवण्या अन् इतर शाळा १ मार्च ते १४ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. साथीचा संसर्ग रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना यापूर्वी दिलेली सवलत कायम ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन पद्धतीने शाळा, महाविद्यालये सर्व खासगी शिकवण्या आणि इतर शाळा चालू रहातील, तसेच इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून  कोविड  १९  विषाणूच्या उपाययोजनांचे पालन करून शक्यतो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असे आदेश शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायदा तसेच शासनाचे अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.