राजीनामा केवळ दडपशाहीतूनच ! – सिनेट सदस्य विष्णु भंगाळे
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांचा राजीनामा !
जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. डॉ. पी.पी. पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजीनामा सोपवला होता. त्याविषयीचे राजभवनाचे पत्र विद्यापिठाला प्राप्त झाले. त्यामुळे ८ मार्चपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाचा पदभार देण्यात येत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे, तर दुसरीकडे विद्यापीठ विकास मंच आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांचा कारभार अन् सरकारी हस्तक्षेप यांना कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापिठाचे सिनेट सदस्य तथा माजी महापौर विष्णु भंगाळे यांनी दिली आहे. ‘कुलगुरु हे चांगले व्यक्तिमत्त्व होते. त्यांना काम करू दिले नाही. काही अप्रिय घटना घडू नये, ही दूरदृष्टी ठेवून डॉ. पी.पी. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच सत्य सर्वांसमोर येईल’, असेही भंगाळे यांनी सांगितले.