आरोपीला क्षमा होणार नाही ! – मुख्यमंत्री
|
मुंबई – सरकार चालवतांना न्यायाने वागण्याचे दायित्व असते. गेल्या काही मासांत गलिच्छ राजकारण होत आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचा असाही तपास नको. ज्या क्षणी पूजा चव्हाण यांच्या संदर्भातील घटना कळली, त्या क्षणी निष्पक्षपणे तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांना कालबद्ध तपास करण्याचे आणि अहवाल देण्याचे आदेश दिले. कुणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपीला क्षमा होणार नाही; पण आदळआपट करून तपासाची दिशा भरकटवायची, हा प्रघात पडत आहे, तो योग्य नाही. सत्य स्वीकारले जाईल आणि दोषींवर कारवाई होईल. तपासयंत्रणा त्यांच्या काळातीलच आहे, तर आता अविश्वास कसा दाखवता ? त्यांच्यावर अविश्वास दाखवणार असाल, तर आपण आपल्या हाताने कुर्हाड मारण्यासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. १ मार्चपासून चालू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
पूजाचे आई-वडील आणि बहीण यांनी भेटून ‘तपास यंत्रणेवर विश्वास आहे’, असे सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘संजय राठोड यांचे त्यागपत्र स्वीकारले असून वनखात्याचा कारभार माझ्याकडे राहील’, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. कोरोनाच्या काळात झालेला भ्रष्टाचाराचा आरोप खोटा आहे. टीका करायला अर्थ हवा. हा आरोप करणार्यांची कीव येते. महाराष्ट्राने कोरोनाच्या संकटाला कसे तोंड दिले, त्याचा इतिहास माध्यमांनी समोर ठेवला आहे. ‘धारावी पॅटर्न’चे जागतिक पातळीवर कौतुक झाले. अशी टीका करण्यामुळे कोविड योद्ध्यांची थट्टा होते. असा दुटप्पी आरोप करणारा विरोधी पक्ष महाराष्ट्राने प्रथम अनुभवला.
२. सावरकर यांची जयंती होती कि पुण्यतिथी याचा अभ्यास करावा. ज्यांना हे माहीत नाही, त्यांनी त्याविषयी ट्वीट न केल्याचे आरोप करणे, हे हास्यास्पद आहे.
३. सीमाप्रश्नाविषयी एकत्र आहेत, ही चांगली गोष्ट आहे; पण आतापर्यंत हा प्रश्न का सोडवला नाही ? आजही महाराष्ट्राने आक्रमक भूमिका घेतली आहे. तुम्ही आमच्या समवेत असाल, तर सीमाप्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. आरक्षणाविषयी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, यासाठी धन्यवाद देतो.
४. तुम्ही मला फुकट काही तरी दिले आहे; पण तुमचे केंद्रातील सरकार ओरबाडत आहे. विजेचा आक्रोश करता मग डिझेल आणि पेट्रोल याविषयी का करत नाही ? पेट्रोलची सेंच्युरी प्रथम पहात आहोत. त्यावर अशा पद्धतीने कर लावला आहे की केंद्रात पैसा जाणार. राज्याच्या वाटेला काही मिळणार नाही. केंद्र सरकारकडूनच राज्याचे पैसे येणे बाकी आहे.
५. त्यांच्या काळातील शेतकर्यांची कर्जमुक्ती आतापर्यंत चालू होती. त्यांच्या काळातील प्रश्नावली काढून आम्ही सोपी केली. आम्ही ही कर्जमुक्ती विनासायास केली.
६. मोहन देलकरांच्या आत्महत्येविषयी कुणी का बोलत नाही ? त्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावे असतील, तर त्यांचीही चौकशी होईल.
७. दळणवळण बंदी करण्याची इच्छा नाही; पण ‘मजबुरी’ शब्द विचित्र आहे.
८. विधीमंडळातही कामाच्या घंट्यांची विभागणी करण्याचे नियोजन करत आहोत.
या वेळी संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र आणि पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांचे पत्र वाचून दाखवण्यात आले. आरक्षणाविषयीचे काम कुठपर्यंत आले, याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
‘सत्तेत लाचारी स्वीकारली’, असे ते म्हणत आहेत; पण सत्तेसाठी देश विकायला काढणारे म्हणून तुमचीही इतिहासात नोंद होईल. केवळ सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची अपकीर्ती करून नका. स्वतःच्याच घरचा काळ बनू नका, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेतील सूत्रांना धरून केली. |