पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांचे त्यागपत्र
मुंबई – बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी शेवटी २८ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यागपत्र दिले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी वरील त्यागपत्र दिले. या प्रकरणी भाजपने राज्यव्यापी आंदोलन करत ‘राठोड यांनी त्यागपत्र न दिल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही’, अशी चेतावणी दिली होती. त्यागपत्र दिल्यानंतर संजय राठोड पत्रकारांना म्हणाले, ‘‘गेल्या अनेक दिवसांपासून बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर विरोधी पक्षाने माझ्या विरोधात घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३० वर्षांत सामाजिक, राजकीय क्षेत्रांत मी कामे केली. ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचे निष्पक्ष अन्वेषण व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे.’’
या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘संजय राठोड यांनी त्यागपत्र दिले असले, तरी पूजाला न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संजय राठोड यांना अटक होणे आवश्यक आहे.’’
भाजपच्या नेत्या सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र स्वीकारल्यानंतर ते पूजा चव्हाणला न्याय देण्याच्या दिशेने पहिले पाऊल असेल. १८ दिवसांनंतरही या प्रकरणी प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट झालेला नाही कि अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संदिग्ध आहे, त्यांना त्या जागेवर बसण्याचा अधिकार नाही.’’