काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
मुंबई – एखादी गोष्ट अल्प दिली जात असेल, तर त्यावर बोलल्यास ते चूक म्हणता येणार नाही. केवळ समान वाटप व्हावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, ‘‘विधानसभेचा अध्यक्ष विनाविरोध नेमण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी परंपरा कायम ठेवावी. राज्यघटनात्मक पदाची निवड करतांना वादविवाद होऊ नयेे. पेट्रोल-डिझेल यांवर सेस घेतला जात असतांना वाहनांकडून पथकरही वसूल केला जात आहे. जनतेची ही दुहेरी लूट आहे. देशातील सर्व पथकर नाके तात्काळ बंद करून ही लूट थांबवावी.’’