मराठी शाळेत शिक्षण घेतल्याने मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या १५९ तरुण-तरुणींचे आंदोलन
मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यभर ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला; पण मराठीबहुल महाराष्ट्रात अशी घटना घडणे लज्जास्पद !
मुंबई – मराठी शाळेत शिक्षण झाले; म्हणून मुंबई महापालिकेत नोकरी नाकारण्यात आली. या प्रकरणी १५९ मराठी तरुण आणि तरुणी गेले २७ दिवस आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. ‘महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी शाळेत शिकलेल्या तरुण-तरुणींना न्याय मिळत नसेल, तर मराठी भाषा दिनाचे नुसते गोडवे गाऊन काय उपयोग ?’, असा प्रश्न मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रात केला. तसेच ‘या तरुण-तरुणींना तात्काळ न्याय मिळावा’, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ही मागणी चिन्मयी सुमीत यांच्यासह मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि शिक्षक संघटना यांनी राज्य शासन अन् मुंबई महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.
१. ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या मुंबई महापालिकेच्या शाळेत नोकरीसाठी उमेदवाराचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक आहे’, असा ठराव वर्ष २००८ मध्ये करण्यात आला होता. त्याचा आधार घेऊन या उमेदवारांना नोकरी नाकारली आहे. हे केवळ तोंडीच सांगितले असून तसे लेखी काहीच दिले नाही.
२. पात्र उमेदवारांना इतर उपलब्ध पर्यायांतून समाविष्ट करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवूनही मुंबई महापालिका त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून सर्व उमेदवार आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत.
याविषयी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असतांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीतच करणे अनिवार्य आहे. गेली ३० वर्षे शिवसेना या मराठीवादी पक्षाकडे मुंबई महापालिकेची सत्ता आहे. असे असतांनाही मुंबई महापालिकेच्याच ‘मुंबई पब्लिक स्कूल’ येथे नोकरीसाठी उमेदवाराचे शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक करणे हे मराठी शाळांमध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळे वर्ष २००८ चा ठराव तात्काळ रहित करून उमेदवारांना तातडीने सेवेत घ्यावे.