सातारा नगरपालिकेच्या ३०७ कोटी ४७ लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला अनुमती
पाणीपट्टी आणि घरपट्टी यांमध्ये वाढ नाही
सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेद्वारे २ लाख ४२४ रुपये शिल्लक दाखवणार्या ३०७ कोटी ४७ लाख ४२४ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत अनुमती देण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम होत्या. अंदाजपत्रक पाणीपट्टी आणि घरपट्टी यांमध्ये कोणतीही वाढ न करणारे असल्याने सातारावासियांना दिलासा मिळाला आहे.
सातारा शहराची नुकतीच सीमावाढ झाली आहे. पालिकेचे अंदाजपत्रक ३०० कोटींच्या पुढे गेले असले, तरी पाणीपट्टी आणि घरपट्टी यांचे निव्वळ उत्पन्न १९ कोटी ७५ लाख रुपयांवर सीमित आहे. त्यामुळे पालिकेवर अधिक आर्थिक ताण येईल, हे निश्चित ! एकीकडे पालिकेने २ लाख ४२४ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केलेले असतांना ३४ कोटी रुपयांच्या पूर्णत: वसुलीचे मोठे आव्हान वसुली विभागाला पेलावे लागणार आहे.