सातारा आणि कराड यांच्या पथकरमुक्तीसाठी खासदारांनी निर्णय घ्यावा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले
पथकरमुक्तीसाठी आंदोलन करावे लागल्यास खासदारांच्या समवेत राहू
पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?
सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – गत अनेक वर्षांपासून आनेवाडी पथकरनाक्याचा प्रश्न गाजत आहे. रस्ते दुरुस्ती असेल किंवा स्थानिकांना पथकरमुक्ती हवी असेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार जिल्हा प्रशासनाला जुमानत नाहीत. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पथकरमुक्तीविषयी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. ज्याप्रकारे खासदार सुप्रिया सुळे यांनी खेड-शिवापूर पथकरनाक्याविषयी आंदोलनाची भूमिका घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहनांसाठी पथकरमुक्तीचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे खासदार भोसले आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा तसेच कराड येथील पथकरमुक्तीसाठी निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागल्यास मी स्थानिक आमदार म्हणून दोन्ही खासदारांच्या समवेत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत स्थानिकांना पथकरमुक्ती मिळावी, यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. रस्ते दुरुस्ती, पथकरामध्ये सवलत याविषयी जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या कोणत्या बैठकीस ठेकेदार किंवा संबंधित अधिकारी उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्न सोडवू शकत नाही. पथकरनाक्यावर बनावट देयके दिली जात असल्याचे नुकतेच उघड झाले आहे. यामुळे पथकरनाके हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे, हे सिद्ध झाले आहे. पथकरनाक्यावरील भ्रष्टाचार आणि स्थानिक वाहनांना पथकरमुक्ती ही मिळालीच पाहिजे.’’-