सोने विक्रीप्रकरणी ८ परप्रांतीय संशयित पोलिसांच्या कह्यात !
सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – कराड तालुक्यातील पेरले गावातील सीमेत सोने तस्करी करण्यासाठी आलेल्या ४ परप्रांतीय संशयितांनी २६ फेब्रुवारी या दिवशी पाटण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यास गंभीर घायाळ केले. या घटनेची तक्रार पोलीस कर्मचारी मुकेश संभाजी मोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासाची सूत्रे गतीमान करत या प्रकरणातील एकूण ८ संशयितांना अवघ्या काही घंट्यांत पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मध्यप्रदेश राज्यातील कटणी शहरातील ८ संशयित सोने विक्रीसाठी पेरले येथे आले होते, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुकेश संभाजी मोरे हे शासकीय कामानिमित्त सातार्याच्या दिशेने निघाले होते. त्यांना बातमीदाराच्या वतीने कराड तालुक्यातील पेरले गावाच्या सीमेत सोने तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा मोरे यांना ४ जण रस्त्याच्या कडेने संशयितरित्या वावरतांना आढळले. मोरे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोरे यांना लाकडी दांडके, लोखंडी गज यांनी मारहाण करून गंभीर घायाळ केले. याविषयी मोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (पोलीस कर्मचार्यावर आक्रमण होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)