अपार गुरुनिष्ठा आणि गुरुभाव
वैचारिक प्रदूषणाला स्वतःची वृत्ती कारणीभूत असणे
‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी एका अभंगात म्हटले आहे की, देवाने आपल्याला कान, डोळे, जीभ यांसारखी ज्ञानेंद्रिये दिली आहेत. त्याचा उपयोग चांगले ऐकणे, पहाणे आणि बोलणे यांसाठी करावा. हे सांगण्याचा उद्देश असा की, आज सर्व प्रकारच्या प्रदूषणापेक्षा वैचारिक प्रदूषण हे अधिक धोक्याचे असते. ज्याने जगात सर्वत्र थैमान घातले आहे, तसेच हे प्रदूषण कोरोनापेक्षाही महाभयानक आहे. त्यामुळे आज जग निराशेच्या उंबरठ्यावर उभे आहे. या सर्वांचा दोष आपण दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष संच या अत्याधुनिक उपकरणांना देतो. जरी हे काही प्रमाणात खरे असले, तरी बहुतांश प्रमाणात चुकीचे आहे; कारण आपण यामध्ये स्वतःमधील महाभयानक दोषांचे खापर ती निर्जीव उपकरणे आणि यंत्रे यांवर फोडतो अन् मोकळे होतो; कारण ती निर्जीव यंत्रे आपल्याशी भांडणार नाहीत, हे आपल्याला निश्चित ठाऊक असते. उदाहरणच द्यायचे झाले, तर दोन भिन्न प्रवृत्तींच्या व्यक्तींच्या हातात काड्यापेटी (माचिस) दिली, तर जो ‘सत्प्रवृत्त’ आहे, तो तिचा उपयोग देवाचा दिवा लावण्यासाठी किंवा अन्य चांगल्या कारणासाठी करील; पण जो ‘तमप्रधान’ आणि ‘विध्वंसक वृत्ती’चा आहे, त्याच्या हातात काडेपेटी दिली, तर तो एखाद्या गवताची गंजी पेटवून देऊन आग लावण्यासाठी करील, म्हणजे यामध्ये दोष काड्यापेटीचा नाही.
यातून लक्षात येईल की, ती वापरणारी जी व्यक्ती आहे, तिच्या गुण-दोषांप्रमाणे त्याचे परिणाम होणार आहेत. त्याचप्रमाणे आपण या अत्याधुनिक उपकरणाच्या यंत्राचा उपयोग चांगल्या हेतूने ज्ञान मिळवण्यासाठी केला, तर त्याचा चांगला उपयोग आहे; पण बहुतांश समाज त्यातील १०० टक्के वाईट गोष्टी पहातो आणि आपल्या घाणेरड्या वृत्तीवर पांघरूण घालण्यासाठी त्या निर्जीव उपकरणांना दोष देण्याचा कावेबाजपणा वा ढोंग करतो.
अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर आवश्यक
हे सगळे काही विस्ताराने लिहिण्याचे प्रयोजन असे की, दूरदर्शन आणि भ्रमणभाषसंच यांच्यावर आपण चांगले शास्त्रीय संगीत, वंदनीय व्यक्तींच्या मुलाखती, उद्बोधक अन् पौराणिक मालिका किंवा तत्सम विषय पाहिले वा ऐकले, तर ते निर्जीव उपकरण यंत्रसुद्धा तुम्हाला खर्या अर्थाने सजीव, म्हणजेच चैतन्यमूर्ती म्हणावे, अशी आदर्श व्यक्ती बनवू शकते.
गुरुनिष्ठेविषयी सध्याच्या काळातील काही उदाहरणे
नुकत्याच मी संगीत क्षेत्रातील श्रीमती देवकी पंडित, श्री. महेश काळे आणि बंगालमधील गायिका कौशिकी चक्रवर्ती या तिघांच्या मुलाखती दूरचित्रवाणीवर वेगवेगळ्या वेळी ऐकल्या अन् पाहिल्या आहेत. या तिघांनी गुरुकृपा, साधना आणि शास्त्रीय संगीताविषयीची महानता सांगितली. ती ऐकून ‘स्वतःची गुरुनिष्ठा कशी असावी ?’, याविषयी जाणवले.
१. श्रीमती देवकी पंडित
यांचे गुरु पंडित वसंत कुलकर्णी, गानतपस्विनी किशोरी आमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी असे तिघेजण आहेत. श्रीमती देवकी पंडित एका मुलाखतीत त्यांच्या गुरूंविषयी म्हणाल्या, ‘‘केवळ स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक येणे, म्हणजे कलेमधील पूर्णत्व नव्हे, तर त्यातून स्वतःला निखळ आनंद मिळतो का ? हे महत्त्वाचे आहे; कारण आपल्यालाच जर आनंद मिळाला नाही, तर तो आपण दुसर्याला देऊ शकत नाही. केवळ गुरुकृपेमुळे आपल्या ध्येयावरील निष्ठेमुळेच ते घडू शकते.’’
२. श्री. महेश काळे
यांचे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी आहेत. एका मुलाखतीमध्ये श्री. महेश काळे यांना सूत्रसंचालकाने विचारले, ‘‘तुम्ही अभियंते आहात, तर तुम्ही संगीत या विषयाला पूर्णत्वाने कसे वाहून घेतले ? तुम्ही ते अर्धवेळही (पार्टटाईम) करू शकला असता ?’’ त्यावर श्री. महेश काळे यांनी नम्रतेने उत्तर दिले, ‘‘माझे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकीबुवा यांनी ज्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले, तो विषय मी ‘पार्टटाईम’ (अर्धवेळ) देऊन कसा करू शकेन ?’’ या उत्तराने सूत्रसंचालक निरुत्तर झाले.
अशा दृढ गुरुनिष्ठेमुळे आज ते संगीत क्षेत्रात एवढे मोठे झाले की, ते तरुण वयातच गेली १० हून अधिक वर्षे अमेरिकेसारख्या ठिकाणी राहून तेथे शास्त्रीय संगीत शिकवतात. तसेच भारतीय संगीत किती महान आणि श्रेष्ठ आहे, हे शिकवून त्याची प्रचीती देतात. त्याचे श्रेय ते त्यांच्या गुरूंना देतात.
३. कौशिकी चक्रवर्ती
यांचे गुरु त्यांचे वडिल पंडित अजय चक्रवर्ती आहेत. कौशिकी चक्रवर्ती यांचेही देश-विदेशात प्रचंड प्रतिसादाचे कार्यक्रम होत असतात. त्याही त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे गुरु पंडित अजय चक्रवर्ती यांनाच देतात. कौशिकी चक्रवर्ती यांनी दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीत सांगितले होते, ‘‘मी माझे गुरु आणि पिता श्री. अजय चक्रवर्ती यांना अजूनही घाबरते; कारण मी संगीत क्षेत्रात सर्व जगाची वाहवा मिळवली असली, तरी माझ्या गुरूंची वाहवा मिळवणे फार कठीण असते. ती क्वचितच केव्हातरी मिळते.’’ सूत्रसंचालकाने त्यांना विचारले, ‘‘तुमचे संगीताशी नाते काय आहे ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी संगीताखेरीज जगूच शकत नाही.’’
केवढी ही गुरुनिष्ठा !
या तीनही कलाकारांचे कार्यक्रम पाहिल्यावर जाणवले की, केवढी ही गुरुनिष्ठा ! ईश्वराने दिलेल्या कलेचा ‘मनोज्ञदर्शन’ म्हणजेच एक प्रकारे ‘ईश्वराचे दर्शन’ त्यांच्या संगीत कार्यक्रमाच्या अविष्कारातून होते. त्यांची अपार अशी गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा पाहून मन भारावून अंतर्मुख होते. मनाला खंत वाटते की, भक्त प्रल्हाद, रामभक्त हनुमान आणि शबरी यांच्याएवढी गुरुभक्ती आपल्याकडे नाही; पण किमान वरील कलाकारांच्या एवढी तरी गुरुनिष्ठा आपल्याकडे आहे का ? मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच ही जाणीव झाली. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. द. र. पटवर्धन, सिंधुदुर्ग (२३.१.२०२१)