महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?
आपत्काळाविषयीची लेखमाला आपण पहात आहेत. आतापर्यंत आपण तिसर्या महायुद्धाचे प्रकार आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी करायच्या उपाययोजना, जैविक अस्त्रांद्वारे होणारी आक्रमणे आणि भूकंप यांविषयीची माहिती वाचली. येणार्या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या लेखात सुनामीविषयी माहिती देण्यात आली आहे. या लेखात सुनामी म्हणजे काय ?, सुनामी येण्यापूर्वी करायच्या काही सिद्धता, सुनामी येण्याची चिन्हे, प्रत्यक्ष सुनामी होत असतांना घ्यायची काळजी, तसेच सुनामी येऊन गेल्यानंतर करायच्या कृती यांविषयीची माहिती देण्यात आली आहे.
भाग ५.
भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453135.html
४. सुनामी
४ अ. सुनामी म्हणजे काय ? : ‘सुनामी म्हणजे भूकंप, पाण्याखालील भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा लघुग्रह याचा आघात यांमुळे निर्माण झालेल्या महाकाय अशा लाटांची मालिका.’ (संदर्भ : ready.gov/tsunamis)
‘कधीकधी सुनामी पाण्याच्या भिंती सिद्ध करू शकते; (ते ‘सुनामी बोर’ म्हणून ओळखले जाते) परंतु सुनामीमध्ये सामान्यत: वेगवान आणि जलद गतीने पूर येण्याची शक्यता असते. हे भरती आणि ओहोटी यांच्या चक्रासारखेच असते. असे घडण्याचा कालावधी १० मिनिटे, १ घंटा किंवा १२ घंटे इतका असू शकतो.’ (संदर्भ : redcross.org/get-help/how-to-prepare-for-emergencies/types-of-emergencies/tsunami.html)
४ आ. सुनामी आपत्तीपासून वाचण्यासाठी करायची पूर्वसिद्धता
१. ‘भारतीय मानक विभागाने (‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’ने) घालून दिलेल्या नियमावलीनुसार घर अथवा इमारत यांचे बांधकाम करावे.
२. सुनामीचे धोके कोणते याचे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला शिक्षण द्यावे. तसेच घर खाली करण्याच्या पद्धतींचा सराव करावा.
३. आपल्या निवासस्थानची समुद्रसपाटीपासूनची उंची, तसेच किनारपट्टीपासून किंवा अन्य जलमार्गापासूनचे अंतर जाणून घ्यावे.
४. जर आपण पर्यटक असू, तर स्थानिक सुनामीत घर रिकामे करण्याच्या पद्धतीची माहिती करून घ्यावी.
५. भूकंप झाला असेल आणि त्या वेळी आपण किनारपट्टी भागात असू, तर प्रशासनाकडून सुनामीची चेतावणी देण्यात आली आहे का ? हे जाणून घेण्यासाठी रेडिओ चालू करावा.
६. जवळच्या सर्वाधिक उंच ठिकाणावर पोचण्याचा सर्वांत सुरक्षित आणि जवळचा अन् सोपा मार्ग ओळखून ठेवावा.’
४ इ. सुनामी येण्याची चिन्हे
१. समुद्र अचानक खूप मागे हटणे (शेकडो मीटर) आणि किनारा खूप मोठा होणे. हा अवधी सुमारे ५ – ६ मिनिटे टिकू शकतो. त्यानंतर अचानक मोठी सुनामीची लाट येते. काही वेळा याउलट म्हणजे समुद्र अचानक खूप पुढे येतो.
२. समुद्रातून अचानक खूप मोठा आवाज येणे.
३. समुद्राजवळ अचानक भूकंपाचे मोठे किंवा दीर्घ हादरे जाणवणे.
४. समुद्रात अचानक खूप मोठी पाण्याची भिंत दिसणे.
५. समुद्राजवळील प्राणी, पक्षी अचानक घोळका करू लागणे, घाबरणे किंवा दूर पळणे.
४ ई. सुनामी होत असतांना घ्यायची काळजी
१. ‘शांत रहावे. घाबरू जाऊ नये.
२. सुनामी खूप जलद प्रवास करते, त्यामुळे आपल्या मालमत्तेस नव्हे, तर स्वतःला वाचवावे.
३. बालक, वृद्ध आणि अपंग, ज्यांना विशेष साहाय्याची आवश्यकता असू शकते त्यांना साहाय्य करावे.
४. सरकारी अधिकार्यांनी निर्देश दिल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे.
५. पाण्यापासून दूर (कमीत कमी ३ किलोमीटर) असलेल्या, तसेच उंच भूमीवर (कमीत कमी ३० मीटर उंच ) त्वरित जावे.
६. समुद्रकाठापासून आणि नदी पात्रापासून दूर रहावे.
७. जर दूर जाणे शक्यच नसेल, तर जवळच्या भक्कम पायाच्या उंच इमारतीच्या छतावर जावे.
८. जर आपण पाण्यात असू, तर तरंगणारी एखादी वस्तू, उदा. तराफा, झाडाचे खोड, आेंडका आदींना घट्ट पकडून रहावे.
९. दोन सुनामी लाटांमध्ये बहुदा काही मिनिटांचा अथवा घंट्यांचा अवधी असू शकतो. त्यामुळे पहिली सुनामी लाट येऊन गेली, तरी पुढील संभाव्य मोठ्या लाटांना सामना करण्याची सिद्धता ठेवावी.
१०. सुनामीच्या वेळी पाण्यासमवेत प्रचंड वेगाने वाहून आलेल्या वस्तूंपासून दुखापत होण्याची शक्यता खूप अधिक असते. सुनामी येऊन गेल्यावर तुटलेल्या वीजवाहिन्या, इमारती कोसळणे आदींपासूनही धोका असतो.
११. जर आपण समुद्रात नौकेमध्ये असू, तर सुनामीच्या वेळी खोल समुद्रात (कमीत कमी ४५ मीटर खोल) जाणे योग्य ठरते; कारण खोल समुद्रात सुनामीच्या लाटा अत्यंत अल्प उंचीच्या असल्याने उथळ समुद्राएवढ्या विध्वंसक नसतात.
१२. जर आपण बंदरावर असू, तर उंच भूमीवर जावे.’
४ उ. सुनामी येऊन गेल्यानंतर करायच्या कृती
१. ‘आपत्ती निवारण अधिकार्यांनी सुरक्षित असल्याचे घोषित केल्यावरच घरी परत यावे.
२. आपत्तीमुळे बाधित झालेल्या भागात जाणे टाळावे. आपली उपस्थिती बचाव आणि अन्य आपत्कालीन कार्यात अडथळा आणू शकते. तसेच दूषित पाणी, कोसळलेले रस्ते, दरड कोसळणे, चिखल आणि इतर धोके यांसारख्या सुनामीनंतरच्या परिणामामुळे आणखी धोका असू शकतो.
३. सुनामी येण्यापूर्वी खूप मोठा भूकंप (रिक्टर स्केलवर ८ -९ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा) आला असल्यास त्याचे केंद्र जवळपास असल्यास पुन्हा भूकंप (आफ्टर शॉक) होऊ शकतो. काही आफ्टर शॉक परिमाण ७ हून अधिक रिक्टर स्केल इतके मोठे असू शकतात आणि दुसरी सुनामी निर्माण करण्यास सक्षम असतात. आफ्टर शॉक न्यून होण्यास दिवस, आठवडे किंवा मास लागू शकतात.
४. पाण्यासमवेत वाहून आलेल्या वस्तूंपासून दूर रहावे.
५. घायाळ झालेल्या किंवा अडकलेल्यांना साहाय्य करण्यापूर्वी स्वत:च्या दुखापतींची तपासणी करावी आणि आवश्यकतेनुसार प्राथमिक उपचार मिळवावेत.
६. एखाद्याची सुटका करण्याची आवश्यकता असल्यास आणि आपल्याला ते शक्य नसल्यास साहाय्यासाठी योग्य उपकरणे असणार्या व्यावसायिकांना बोलवावे.
७. बालक, वृद्ध अपंग अशांसारख्यांना विशेष साहाय्याची आवश्यकता असू शकते, त्यांना साहाय्य करावे.
८. नवीनतम माहिती मिळवण्यासाठी रेडिओ किंवा दूरचित्रवाहिनी यांचा वापर करावा.
९. सुनामीच्या पाण्यामुळे इमारतींची हानी होऊ शकते किंवा भिंती कोसळू शकतात. त्यामुळे सभोवताली पाणी साचलेल्या कोणत्याही इमारतीपासून दूर रहावे. इमारतीत किंवा घरात पुन्हा प्रवेश करतांना खबरदारी घ्यावी. स्वच्छता करतांना दुखापती टाळण्यासाठी संरक्षक कपडे घालावेत आणि सावधगिरी बाळगावी.
१०. जर सुनामीमुळे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी आले असेल, तर पाण्यासहित आलेला गाळ घट्ट होण्यापूर्वी त्याला बाहेर काढावा.
११. वार्याद्वारे घर कोरडे होण्यासाठी खिडक्या आणि दारे उघडी ठेवावीत.
१२. उघड्यावरील काहीही खाऊ किंवा पिऊ नये.
१३. आपले घर रिकामे करणे आवश्यक असल्यास आपण कुठे जात आहोत, हे सांगणारा संदेश सोडावा.
१४. अफवा पसरवू नयेत, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.’
(क्रमश:)
भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –