मराठी भाषेसाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता ! – राज ठाकरे
मुंबई – मराठी भाषेसाठी प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नसून प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. मराठी बांधवांनी मराठीतून स्वाक्षरी करावी. मी सगळीकडे मराठीतच स्वाक्षरी करतो. प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नाही. आपण अशा कृतीतून भूमिका घ्यायला हवी.
२. सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथे धुडगूस घालू शकतात; पण शिवजयंती, मराठी भाषा दिन या कार्यक्रमांना अनुमती दिली जात नाही. कोरोनाचे संकट पुन्हा येत आहे, तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला.
३. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सरकारच्या मनात आहे कि नाही ? याविषयी माहिती नाही. मराठी भाषा गौरव दिन आल्यानंतर सरकारला जाग का येते ?