छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून ग्रामस्थांना नोटीस
सातारा, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – वेळे (जिल्हा सातारा) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ५० फूट उंच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा अतिक्रमित जागेत उभारल्याचे कारण सांगत रस्ते विकास महामंडळाने पुतळा हटवण्यासाठी वेळे ग्रामस्थांना नोटीस दिली आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. ५० फूट उंच असलेला हा पुतळा राष्ट्रीय महामार्गावरून स्पष्ट दिसतो. तेथे ‘सेल्फी पॉईंट’ही निर्माण करण्यात आला आहे. सातारा शहराच्या वैभवात भर घालणारा हा पुतळा महामार्ग अतिक्रमण पथकाने २६ फेब्रुवारी या दिवशी काढण्यासाठी प्रयत्न चालू केले. या वेळी स्थानिक शिवभक्तांनी एकत्र येत याला विरोध केला. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस दलाला पाचारण करण्यात आले.
महाराजांच्या पुतळ्याला हात लावाल, तर माझ्याशी गाठ आहे ! – छत्रपती उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला केवळ स्पर्श केला, तरी त्याचे मोठे मूल्य मोजावे लागेल. मी पुतळ्याजवळ उभा रहातो, बघूया कोण पुतळ्याजवळ येतो ते ? महाराजांच्या पुतळ्याला हात लावाल, तर माझ्याशी गाठ आहे, अशी चेतावणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.